अदानी प्रकरणी जेपीसीला शरद पवारांचा विरोध तर, काँग्रेस मात्र निर्णयावर ठाम

अदानी प्रकरणी जेपीसीला शरद पवारांचा विरोध तर, काँग्रेस मात्र निर्णयावर ठाम

संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करु नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांवर केला आहे.

गौतम अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसी अर्थात जॉईंट पार्लिमेंट्री कमिटी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. पण विरोधात बसून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस विरोधी भूमिका घेत मत मांडल्याने शरद पवार यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? अशा चर्चांना आता उधाण येऊ लागले आहे. तर अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी जेपीसीच्याबाबत काँग्रेसकडून ठाम भूमिका घेण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्या या भूमिकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. तर याबाबत बोलताना त्यांनी कोशसा घोटाळ्याचा संदर्भ दिला आहे.

शरद पवार यांच्या विधानाबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पण तुम्हाला आठवत असेल की जेव्हा कोळसा घोटाळ्याचा आरोप झाला होता, तेव्हा कोर्टाची समिती बसवण्यात आली होती. पण तेव्हा देखील विरोधकांच्या सांगण्यावरुन जेपीसीमार्फत चौकशी करण्यात आली होती” असे सांगत नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष अदानीची चौकशी जेपीसीमार्फत करण्यात यावी, या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हणाले आहेत.

तसेच, शरद पवारांचे हे वैयक्तिक मत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानीच्या प्रकरणात घाबरत का आहेत? असा प्रश्न आता देशातील नागरिक विचारत आहे. कारण यामध्ये एलआयसीचा, एसबीआयचा किंवा पीएफचा पैसा असण्याची शक्यता असल्याने जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण त्यांचा पैसा लुटला जात आहे. देशाची जनता पंतप्रधानांना प्रश्न विचारत आहे पण पंतप्रधान या विषयावर बोलायला तयार नाहीत, असेही नाना पटोले यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

काय म्हणाले होते शरद पवार?
“जेपीसीमध्ये दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती असते. ज्या पक्षाचे सदस्य जास्त असतात, त्यांना या कमिटीमध्ये अधिक जागा मिळतात. त्यामुळे या कमिटीमध्ये विरोधकांचे सदस्य कमी आणि सत्ताधाऱ्यांचे सदस्य अधिक असतील. याप्रकरणाची चौकशी नीट करावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. जेपीसीला मी विरोध करत नाही, जेपीसीचा मीही अध्यक्ष होतो. जेपीसी बहुमत बळावर समिती असते, त्यामुळे सुप्रीम कोर्ट समिती प्रभावी ठरेल. बाहेरची संघटना सांगेल त्यापेक्षा सुप्रीम कोर्ट सांगेल ते जनता स्वीकारेल,” असे शरद पवार यांच्याकडून अदानी प्रकरणातील जेपीसी चौकशीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.


हेही वाचा – ‘सावरकर’ आणि ‘अदानी’च्या मुद्द्यावरून शरद पवारांची चाल, राहुल गांधींसह काँग्रेस तोंडावर

First Published on: April 8, 2023 3:51 PM
Exit mobile version