घरमहाराष्ट्र'सावरकर' आणि 'अदानी'च्या मुद्द्यावरून शरद पवारांची चाल, राहुल गांधींसह काँग्रेस तोंडावर

‘सावरकर’ आणि ‘अदानी’च्या मुद्द्यावरून शरद पवारांची चाल, राहुल गांधींसह काँग्रेस तोंडावर

Subscribe

मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात रान उठवण्याची जय्यत तयारी काँग्रेसने केली आहे. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यापेक्षा आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. त्यांच्या या चालीमुळे राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस तोंडावर आपटली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुरुवातीपासूनच काँग्रेसमधील अस्वस्थ नेते होते. 1978मध्ये बंडाचे निशाण फडकावत काँग्रेसमधून ते बाहेर पडले आणि वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. पुरोगामी लोकशाही दलचा (पुलोद) प्रयोग करत ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नऊ वर्षांनी 1987 साली राजीव गांधींच्या उपस्थितीत शरद पवारांनी पुन्हा एकदा काँग्रेस (इंदिरा) पक्षात प्रवेश केला. पण लगेच 11 वर्षांनी म्हणजे 1999मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केल्याने पक्षाने त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली, पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पंतप्रधानपदापासून लांब असलेल्या शरद पवारांना काँग्रेसमध्ये देखील अध्यक्षपद स्वप्नच राहिले.

- Advertisement -

सावरकरांच्या चर्चेला पूर्णविराम
आताही शरद पवारांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गौतम अदानी यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेऊन काँग्रेसची आणि ओघाने राहुल गांधी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. गेल्या महिन्याच्या अखेरीस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सावरकरांविषयीच्या अवमानकारक वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नाराजीचा मुद्दा शरद पवार यांनी मांडला होता. आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावर आपण चर्चा करायला हवी. सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएस यांच्यामध्ये संबंध नाही, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली होती. त्याला मित्रपक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शविली. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा आदर करतो, असे म्हटल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

अदानींबद्दलही सल्ला, पण अदानींच्याच चॅनलवरून
गौतम अदानी यांच्या उद्योग समूहावर आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग संस्थेचे नाव कधी ऐकलेले नव्हते, असे सांगतानाच, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) स्थापन करण्याची आवश्यकता राहिली नाही, असेही त्यांनी नमूद केले. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली. त्यातही, गौतम अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत, हा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. याबाबत मात्र पवारांनी स्पष्टपणे काही सांगितले नाही. विशेष म्हणजे, गुरुवारी (6 एप्रिल 2023) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी ही मुलाखत दिली आणि ज्या वृत्तवाहिनीला त्यांनी ही मुलाखत दिली, त्या एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचा ताबा अदानी समूहाने अलीकडेच घेतला आहे.

- Advertisement -

अदानी आणि पवार यांचे संबंध पूर्वीपासून सलोख्याचे
राहुल गांधी आणि काँग्रेसकडून वारंवार ‘गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी’ यांचे मित्र असल्याचा आरोप वारंवार करत असले तरी, अदानी हे शरद पवारांचेही चांगले मित्र आहेत. याची कबुली दस्तुरखुद्द शरद पवारांनी गेल्यावर्षी मे महिन्यात जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या कार्यक्रमात दिली होती. ‘ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी शून्यातून सुरुवात केली होती. आता तुम्ही विमानाने जिथे जाल, तिथे अदानीचे विमानतळ वापरावे लागते,’ असे ते म्हणाले होते.

इतकेच नव्हे तर त्यांचे कौटुंबिक संबंध कसे घनिष्ट आहेत, याची माहिती शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी जून 2022मध्ये बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात दिली होती. ‘गौतम अदानी आणि पवार कुटुंबीयांचे संबंध गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आहेत. अदानी दर वर्षी दिवाळीला बारामतीत येतात,’ असे त्या म्हणाल्या होत्या. त्यावेळी बारामतीत पवार कुटुंबीयांकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना अदानी सहकुटुंब हजर होते. तर, आमदार रोहित पवार यांनी गाडी चालवत अदानींचे सारथ्य केले होते.

या सर्व गोष्टी लक्षात घेता, शरद पवारांच्या चालीने राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसची कोंडी झाली असून यावर काँग्रेस काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. यातूनच 2024ची समीकरणे देखील ठरण्याची चिन्हे आहेत.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -