गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचं ‘हे’च भाषण ऐकत आलोय – शरद पवार!

गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचं ‘हे’च भाषण ऐकत आलोय – शरद पवार!

दसरा मेळाव्यात संजय राऊतांनी २५ वर्ष महाविकासआघाडीचं अर्थात शिवसेनेचं सरकार राहील, असा आशावाद व्यक्त केल्यानंतर दोनच दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘राज्यात एकहाती भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा’, असे आदेश शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांना दिले. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असतानाच आता शरद पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं भाषण ऐकत आलो आहे’, असं शरद पवार म्हणाले आहेत. मात्र, पहिल्या वाक्यात टोला लगावतानाच दुसऱ्याच वाक्यात शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं. ‘प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही’, असं ते म्हणाले आहेत.

तयारीला लागा – उद्धव ठाकरे

मंगळवारी मध्यरात्री उशीरापर्यंत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुखांना पक्षवाढीसाठी काम करण्याचं आवाहन केलं. ‘जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करायला हवं. आर्थिक बाबतीत सध्या थोडी कमतरता आहे. पण त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल. पण कोविड काळात राज्य सरकारने केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा. शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ताकद देऊ. राज्यात एकहाती भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा’, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर महाविकासआघाडीत सारंकाही आलबेल नसून अजूनही तिन्ही पक्ष आपापल्या रस्त्यानेच चालत असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर शरद पवारांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील उत्तर दिलं. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंच्या विधानावर सारवासारव करतानाच शरद पवारांनी विरोधकांच्या हाती आयतंच कोलीत दिल्याचं म्हटलं जात आहे.

First Published on: October 28, 2020 7:06 PM
Exit mobile version