तिवरे धरण दुर्घटना: बाधितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून मदत करा – शरद पवार

तिवरे धरण दुर्घटना: बाधितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून मदत करा – शरद पवार

शरद पवार

तिवरे धरण फुटीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत-अनुदान करण्यात यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी पत्रामार्फत ही विनंती केली आहे. शरद पवारांनी सोमवारी तिवरे दुर्घटनेत बाधीत झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याची बाब निदर्शनास आली. दुर्घटनेतील बाधितांच्या कुटुंबियांना शासनाने ४ लाख सानुग्रह अनुदान वाटप केले आहे. हे आदेश कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवेळी स्थायी आदेशाद्वारे दिले जाणारे अनुदान आहे. त्यामुळे बाधितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून मदत-अनुदान वितरीत करण्यात यावी, अशी विनंती शरद पवार यांनी पत्रात केली आहे.


हेही वाचा – तिवरे धरण दुर्घटना : २० जणांचे मृतदेह सापडले; ३ जण अजूनही बेपत्ता


 

काय म्हटले आहे पत्रात?

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेमुळे काही लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. धरण फुटीमुळे मोठे जीवित आणि वित्तहानी झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. या आपत्तीत जनावरे, शेळ्या, कोंबड्या असे पाचशे पेक्षा अधिक पशूधन प्राणास मुकले. त्याचबरोबर धरण फुटीत पुराच्या पाण्यामुळे फक्त पीकच वाहून गेले नाही तर शेतजमीन सुद्धा वाहून गेली. त्यामुळे तेथील नागरिकांचा उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाल्याचे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे. याशिवाय जमीन सुधारणा करण्यासाठी निधीची तरतूद करावी, असेही शरद पवार म्हणाले आहेत.

First Published on: July 10, 2019 11:12 AM
Exit mobile version