पवार बोलले नाहीत, पण लिहित्या हातांनीही राज्यासाठी मदतच धावली

पवार बोलले नाहीत, पण लिहित्या हातांनीही राज्यासाठी मदतच धावली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तोंडावरील अल्सर काढून टाकण्याची एक छोटी शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली. त्या शस्त्रक्रियेनंतर रूग्णालयात उपचार घेऊन पवारांना नुकताच डिस्चार्ज मिळाला. पण रूग्णालयातूनही पवारांचे राज्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष होते. अनेकदा आढावा घेण्यापासून परिस्थितीचे अपडेट्स घेताना पवार दिसून आले. पण डिस्चार्जनंतरही पवार किती सक्रीय असतात याचेच उदाहरण हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केलेल्या पक्षामार्फतच्या मदतीतून समोर आले आहे. बोलण्यासाठी अडचण येत असतानाच पवारांनी पक्ष कार्यकर्ते आणि आमदार तसेच खासदारांच्या नावे एक संदेश स्वतःच्या हाताने लिहिला. राज्यातील कोरोना परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पक्षाकडून मदत करण्याची धडपड यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली. पवारांना स्वतःच्या हाताने एक चिठ्ठी लिहून याबाबतचे संदेश दिला आहे.

काय म्हटले आहे त्या चिठ्ठीत ?

आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन, कोरोना संदर्भात मृत्यूमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा / पोलिस दल / शासकीय कर्मचारी यांचेसाठी आपल्या पक्षामार्फत तसेच रूपये १ कोटी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे देण्यात यावेत. श्री टकरे व्यवस्था करताहेत.


शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच सर्वप्रथम राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला व कोरोनासोबतच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कोषाध्यक्षांना दिल्या. दिरंगाई न होता तातडीने ही मदत मिळावी यासाठी पवारसाहेबांनी एका कागदाच्या कोपऱ्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात या सूचना लिहून पाठवल्या.

रुग्णालयात असतानाही पवारसाहेब सातत्याने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा असो किंवा लसीकरणातली अडचणीची परिस्थिती असो वा ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधात निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती असो रुग्णालयात असतानाही पवारसाहेब रोज परिस्थितीचं अवलोकन करत होते. नव्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्याच्या तिजोरीवर पडलेला ताण साहेबांच्या ध्यानात आला आणि त्यांनी रुग्णालयातून घरी परतल्यावर पक्षसहकाऱ्यांना तातडीने मदतनिधीसंबंधीच्या सूचना दिल्या.

महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आपदेला तोंड देत आहे. राज्यातील जनता व प्रशासन या आपदेसोबत जोमाने लढत असले तरी एकूणच जगभरचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. तसेच राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असल्याने राज्याच्या तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना सोबत लढण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नागरिकांच्या सहाय्यासाठी तत्पर असल्याचे सांगतानाच या निधीचा स्वीकार करावा अशी विनंती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी अजितदादा पवार, ट्रस्टी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ट्रस्टी आणि खासदार सुप्रियाताई सदानंद सुळे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबईच्या युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनी केली आहे.


 

First Published on: April 30, 2021 5:31 PM
Exit mobile version