मंत्रांची टिंगल करून खिदळणारे मंत्री…, शरद पोंक्षेंची जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नानंतर टीका

मंत्रांची टिंगल करून खिदळणारे मंत्री…, शरद पोंक्षेंची जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नानंतर टीका

राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतील इस्लामपूरमधील सभेत भाष्य केलं होतं. कन्यादानाच्या वेळी भटजी जे मंत्र म्हणतात, त्यावरून मिटकरींवर अभिनेते आणि शिंदे गटातील नेते शरद पोंक्षे यांनी टोला लगावला आहे. लग्नातल्या मंत्रांची टिंगल करून खिदळणाऱ्या मंत्र्यांच्या घरातल्या लग्नात मंत्र म्हटले असतील का?, अशा आशयाची फेसबुक पोस्ट पोंक्षेंनी करत अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली.

शरद पोंक्षेंची फेसबुक पोस्ट काय?

बदल स्वागतार्ह. काही दिवसांपूर्वी लग्नातल्या मंत्रांची टिंगल करून खिदळणाऱ्या मंत्र्यांच्या घरातल्या लग्नात मंत्र म्हटले असतील का? मंगलाष्टक म्हणून अक्षता टाकणारे नेते दिसले, म्हणून ही शंका आली, अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अमोल मिटकरी आणि जयंत पाटील यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

सांगलीतील इस्लामपूरमध्ये झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी एक किस्सा सांगितला होता. म्हणा ‘मम भार्या समर्पयामी’ मी नवरदेवाच्या कानात कुजबुजलो, अरे येड्या, ते महाराज म्हणतायत, मम म्हणजे माझी.. भार्या म्हणजे बायको… आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा… आरारारा.. कधी सुधारणार, असं मिटकरी म्हणाले होते.

दरम्यान, जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतीक पाटील विवाह बंधनात अडकले आहेत. इस्लामपूरमध्ये अत्यंत शाही विवाह सोहळा पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, शरद पोक्षेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीका केली असून अमोल मिटकरी काय उत्तर देतात का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : गोवर बाधित बालकांना 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार; आरोग्यमंत्री सावंतांची माहिती


 

First Published on: November 30, 2022 3:08 PM
Exit mobile version