राजकारणात तडजोड केल्यानंतरच युती होते, शिंदे गटाकडून आंबेडकरांना सल्ला

राजकारणात तडजोड केल्यानंतरच युती होते, शिंदे गटाकडून आंबेडकरांना सल्ला

prakash ambedkar

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर या दोघांमध्ये सुमारे अडीच तास बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. यावेळी पत्रकार परिषद घेत आंबेडकर यांनी दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली यावर स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, राजकारणात तडजोड केल्यानंतरच युती होते असा सल्ला शिंदे गटाकडून प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसचे महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. मात्र, तरीदेखील महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना युती करायची आहे. मात्र, कोणाबरोबर करायची हे त्यांनी ठरवले पाहीजे.

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यासाठी राष्ट्रवादी नको. आमच्यासोबत युती करण्यासाठी भाजप नको, असं प्रकाश आंबेडकरांचं मत आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी. राजकारणात कुठेतरी तडजोड करावी लागते. तडजोडीनंतरच युती होत असते, असं संजय शिरसाट म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, मला फोन आला होता की, मुख्यमंत्र्यांना भेटायला या. म्हणून मी गेलो. भेटीदरम्यान इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत भेट घेतली. भेट देऊन प्रतिकृती बरोबर आहे की नाही ते पाहावे, यावर चर्चा झाली. पण माझ्या निर्णयात ठाकरेंसोबतच्या युतीत कोणताही बदल झालेला नाही. हे मुख्यमंत्री शिंदेंनाही माहिती आहे, असं स्पष्टीकरण आंबेडकरांनी दिलं होतं.


हेही वाचा : पदवीधर निवडणूक : काँग्रेसची नामुष्की करण्याचा फडणवीसांकडून करेक्ट कार्यक्रम?


 

First Published on: January 12, 2023 7:31 PM
Exit mobile version