पदवीधर निवडणूक : काँग्रेसची नामुष्की करण्याचा फडणवीसांकडून करेक्ट कार्यक्रम?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठमोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. यावेळी नाशिकची जागा काँग्रेसला मिळाली होती. परंतु नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे आणि यामागील खरे सूत्रधार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं सांगितलं जात आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, यासाठी त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला. पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या नाट्यमय घडामोडीत ते बिनविरोध निवडून येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी आपण फक्त महाविकासआघाडीच नाही तर भाजपचाही पाठिंबा मागणार असल्याचं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.

सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसवर मात्र मोठी नामुष्की ओढावली आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनीच काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम तर केला नाही ना?, अशा प्रकारच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. ७ डिसेंबर २०२२ रोजी सत्यजीत तांबे यांच्या सिटीझनविल या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले होते की, खरंतर बाळासाहेब माझी तक्रार आहे, तुम्ही किती दिवस असे नेते बाहेर ठेवणार आहात. जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो. चांगली माणसं जमाच करायची असतात, असं फडणवीस म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर सत्यजीत तांबे यांनीही या कार्यक्रमात सूचक वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या लोकांची पारख आहे, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं होतं.

सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रसने उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यामुळे सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आला. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे सत्यजित तांबेंनी दोन अर्ज भरले. त्यामुळे आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत, याबाबत सत्यजित तांबे यांनी माहिती दिली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असला तरीही ते काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया काय?

सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरलाय असं सांगताय. त्यावेळी आमचे उमेदवार सुधीर तांबे यांची काय भूमिका होती, त्यांची काय परिस्थिती होती या सगळ्या घटना महत्त्वाच्या आहेत. कारण तिथे आमचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात होते. त्यामुळे नेमकं काय झालंय याची माहिती घेऊनच आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया देऊ, असं नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : मोठी बातमी! पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सत्यजित तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज