शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे घेणार आदित्य ठाकरेंची भेट

शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे घेणार आदित्य ठाकरेंची भेट

नाशिक : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागाच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात सत्तापरिवर्तन आणि पक्षातील पडझड यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत निष्ठा यात्राच्या माध्यमातून शिवसैनिकांना भेटी दिल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात आदित्य ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी गुरुवारी (दि.२१) ठाणे, भिवंडी येथे कार्यकर्त्याशी भेटीगाठी घेत संवाद साधला. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी आणि नाशिक शहरात त्यांचा मेळावा पार पडला. यानंतर पुढच्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदार संघात मेळावा घेणार आहेत. याच वेळी आमदार कांदे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे. कांदे आपल्या हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आदित्य यांना एक निवेदन सादर करणार असल्याचे सांगितले जातंय. यामुळे नांदगाव मतदार संघात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

आदित्य ठाकरे याच्या नांदगाव मतदार संघाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार कांदे यांनी संपूर्ण मतदार संघात ‘माझं काय चुकलं’ अश्या आशयाचे पोस्टर लावले आहेत. दरम्यान याबाबत एक निवेदन कांदे आदित्य ठाकरे यांना देतील. यात मतदार संघातील कामे, हिंदुत्व, नवाब मलिक आणि भुजबळ यांच्यासोबतची युती याबाबत विचारणा करणारे प्रश्न असणार आहेत.

एका बाजूला जिल्ह्यातील शिंवसेना आमदार सुहास कांदे आणि दादा भुसे यांच्या बंडानंतर शिवसेनेत संघटनात्मक खांदेपालट करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली आहे. अश्या परिस्थितीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह आदित्य यांची भेट घ्यायला आले तर त्याठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो. याबाबत आता पोलीस यंत्रणाही सजग झाली आहे.

First Published on: July 22, 2022 9:33 AM
Exit mobile version