मुंबईला सोन्याची कोंबडी बोलणं म्हणजे आदित्य यांच्या पोटातलं आलं ओठात – राहुल शेवाळे

मुंबईला सोन्याची कोंबडी बोलणं म्हणजे आदित्य यांच्या पोटातलं आलं ओठात – राहुल शेवाळे

मुंबई महानगरपालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, हे आदित्य ठाकरेंच्या मनातील शब्द आज ओठावर आले. यावरून त्यांची मुंबई महानगरपालिकेकडे बघण्याची दृष्टी नेमकी कशी आहे हे स्पष्ट होतेय, अशा शब्दांत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, ‘मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची जाणीव त्यांना आत्ता झालीय. गेले 20-25 वर्षं पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे खड्ड्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही’, असेही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले. (Shinde Group MP Rahul Shewale Slam Aaditya Thackeray On BMC)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कामांवरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी महापालिकेतील टेंडरचा पाढा वाचत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. शिवाय, “मुंबई ही त्यांच्यासाठी अंड देणारी कोंबडी असेल, आमच्यासाठी कर्मभूमी आहे. याच भुमीला आम्ही इतके वर्षे जमली आणि अजूनही जपतोय”, असे वक्तव्य केले.

आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची जाणीव त्यांना आत्ता झालीय.वास्तविक, गेले 20-25 वर्षं पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे खड्ड्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्ही २०-२५ वर्ष केलेले खड्डे आम्ही नक्कीच भरुन काढू. माननीय मुख्यमंत्री या खड्ड्यातून जनतेला नक्कीच बाहेर काढतील. नवीन पद्धतीची टेंडरप्रक्रीया राबविण्यात येईल. एक ते दोन महिन्यात वेगाने खड्ड्यांची कामे पूर्ण होतील”

“शासकीय बदल्यांबाबत चुकीची माहिती पसरवली जाते. याआधी जे सरकार अडीच वर्षं होते, त्यावेळी बदल्यांचे सर्व अधिकार आदित्य ठाकरे आणि वरुण देसाई यांच्याकडे होते. बदलीबाबत आम्हाला पालिका आयुक्त सांगायचे की तुम्ही आदित्य ठाकरे किंवा वरुण सरदेसाई यांना भेटा”, असाही टोला त्यांनी आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांना लगावला.

याशिवाय, “वास्तविक, आम्हाला वाटले होते की काँग्रेसच्या राहूल गांधीनी सावरकरांचा जो अपमान केला त्याचा निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद असेल, पण या पत्रकार परिषदेत कोणत्याही प्रकारचा निषेध नोंदविण्यात आला नाही. आमच्यावर आरोप करण्यापूर्वी तुम्ही राहूल गांधीची गळाभेट का घेतली ते सांगा”, असेही शेवाळेंनी म्हटले.


हेही वाचा – सावरकरांवरील टीकेवरून फडणवीसांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर, वृत्तपत्रांची जुनी कात्रणे केली ट्वीट

First Published on: November 18, 2022 10:27 PM
Exit mobile version