Shiv Jayanti 2022 : औरंगाबादच्या क्रांती चौकात शिवरायांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण

Shiv Jayanti 2022 : औरंगाबादच्या क्रांती चौकात शिवरायांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण

Shiv Jayanti 2022 : औरंगाबादच्या क्रांती चौकात होणार शिवरायांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण

आज राज्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. यंदाच्या छत्रपती शिवजयंती निमित्त देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा औरंगाबादच्या क्रांती चौकात बसवण्यात आला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. या खास दिवसानिमित्त संपूर्ण क्रांती चौक परिसरात आकर्षक, नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण परिसर लख्ख प्रकाशाने उजळून निघाला आहे. या सोहळ्यानिमित्त शहारातील 15 ढोल-ताशा पथकांनी एकत्रितपणे छत्रपती शिवरायांना महाशिवादन अर्पण केले. देशातील सर्वात उंचीचा पुतळा औरंगाबादमध्ये असल्याने तो पाहण्यासाठी औरंगाबादकरांनी गर्दी केली होती. यामुळे परिसरात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ऑनलाइन पद्धतीनं या सोहळ्याला हजेरी लावली.

या खास पुतळ्याची वैशिष्ट्ये

छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातील सर्वात उंचीच्या या पुतळ्याची उंची जवळपास 21 फूट इतकी आहे. तर वजन 7 मेट्रिक टन एवढे आहे. ब्राँझ धातूपासून महाराजांच्या या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली असून पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची 21 फूट इतकी आहे. चौथऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची 52 फूट इतकी उंच आहे. चौथऱ्याच्याभोवती 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या असून चौथऱ्याभोवती आकर्षक कारंजे तयार करण्यात आले आहे. या पुतळ्यामुळे आता औरंगाबादच्या अभिमानात भर पडली आहे.

याशिवाय सांगली, सोलापूर, बीड जिल्ह्यांमध्येही ठिकठिकाणी शिवजन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. बहुसंख्य शिवप्रेमींकडून शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील छत्रपतीच्या पुतळा भोवती आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.


 

First Published on: February 19, 2022 9:02 AM
Exit mobile version