Breaking : पुण्यात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते भिडले, किरीट सोमय्यांना धक्काबुक्की

Breaking : पुण्यात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते भिडले, किरीट सोमय्यांना धक्काबुक्की

kirit somaiya

पुणेः पुण्यात शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलाय. त्यानंतर किरीट सोमय्यांना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पुण्यात शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून, शिवसैनिक सोमय्यांच्या अंगावर धावून गेल्याचंही चित्र पाहायला मिळालंय.

पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं ट्विट सोमय्या यांनी केलंय. विशेष म्हणजे संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गेले होते. त्यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता हा सगळा प्रकार घडलाय.

किरीट सोमय्या हे महापालिका परिसरात असतानाच काही शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही काही शिवसैनिकांनी केला. एवढ्यावरच न थांबता सोमय्या यांच्या गाडीपुढे काही शिवसैनिक आडवे पडले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडालाय. सरकार तुमचं आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करून दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसैनिकांवरही पलटवार केलाय.

नेमकं काय घडलं?

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे व्यावसायात भागीदार असलेल्या सुजित पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते, त्याच दरम्यान किरीट सोमय्या पुणे महापालिका परिसरात आले असता काही शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिथे काही भाजपचे कार्यकर्तेही होते, त्यामुळे दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच त्या गदारोळात काही शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही केला. परंतु वेळीच त्यांच्या सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करत त्यांना गाडीत बसवले. सध्या किरीट सोमय्या जवळच्याच रुग्णालयात दाखल झालेत.

दरम्यान, या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित केलाय. आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे?, असे सवाल केले आहेत. आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका, असा इशारा त्यांनी दिला आहे. तर हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत. भाजप कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तर किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. आजच्या शिवसैनिकांच्या हल्ल्यांमुळेही सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

First Published on: February 5, 2022 6:12 PM
Exit mobile version