अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी होणार

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी होणार

अर्णब गोस्वामी यांची अन्वय नाईक प्रकरणात चौकशी होणार

मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल शिवसेनेचे आमदार रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अर्णब गोस्वामी याच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यानंतर आमदार सुनील प्रभू यांनी आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने तक्रार दाखल केल्यानुसार चौकशी सुरु आहे. लवकरच नाईक कुटुंबाला न्याय दिला जाईल.

सुनील प्रभू म्हणाले की, अन्वय नाईक प्रकरणात एका मराठी भगिणीचे कुंकू पुसले गेले, या प्रकरणाची चौकशी करावी. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, “अन्वय नाईक आर्किटेक्ट होते. अर्णब गोस्वामीसाठी त्यांनी इंटेरियरचे काम केले होते. मात्र अर्णबकडून त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. त्याबद्दल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने तक्रार दाखल केली आहे. तसेच सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. त्याप्रमाणे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.”

यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाप्रमाणे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सुनावणी करावी, अशी भूमिका व्यक्त केली. तर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी म्हणाले की, “अर्णब गोस्वामीला त्याच्या खुर्चीवरुन उचलून फेकले पाहीजे. त्याची खरी जागा जेलमध्ये आहे. अर्णब गोस्वामीने तबलिगी जमातला बळीचा बकीरा केले होते. तबलिगी जमात कोरोना संक्रमण करणारी जमात असल्याचे सांगितले होते.” तसेच कंगना राणावत म्हणते फिल्म इंडस्ट्रीमधून इस्लामिक वर्चस्व संपवले. तिने फिल्म इंडस्ट्रीमधील काही लोकांचा निषेध जरुर करावा. पण त्यात इस्लामला आणण्याची काय गरज? त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या कंगना राणावतवरही सरकारने कारवाई करावी, अशी मागणी आजमी यांनी केली.

First Published on: September 8, 2020 1:37 PM
Exit mobile version