‘हे सरकार टेस्ट ट्यूब बेबी नाही, विचारपूर्वक महाविकास आघाडीचा जन्म’ – संजय राऊत

‘हे सरकार टेस्ट ट्यूब बेबी नाही, विचारपूर्वक महाविकास आघाडीचा जन्म’ – संजय राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत

राज्यात शिवसेना – काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. विधानसभेचा निकाल लागल्यानतंर या तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केल्यामुळे हे सरकार किती दिवस चालेल? याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. “आमचे सरकार हे काही टेस्ट ट्यूब बेबी नाही. आम्ही पुर्ण विचारपुर्वक हे मुल जन्माला घातलं आहे. विधानसभेचा निकाल लावण्यापूर्वीच याचा विचार झाला होता. भाजप शब्द पाळणार नाहीत. याची आम्हाला पुर्ण खात्री होती.” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. लोकमत वृत्तपत्राच्या कार्यक्रमात लाईव्ह मुलाखतीत राऊत यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

सजंय राऊत पुढे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आम्हाला याची शंका आली होती. लोकसभेत भाजपला ३०२ जागा मिळून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले याचा आम्हाला आनंद आहे. पण राजकारणात माझं ते माझं, पण तुझं ते माझ्या बापाचं, असा एक स्वभाव असतो. त्यातून आम्हाला खात्री होती की, हे गडबड करणार आणि शेवटी तेच झालं.” तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांशी आघाडी कशी केली? या प्रश्नावर राऊत म्हणाले की,  “काँग्रेस-राष्ट्रवादी हे काही पाकिस्तानमधील पक्ष नाहीत. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातीलच आहेत. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मातीतील पक्ष जर एकत्र आले तर त्यात काय बिघडलं?”

आमचे सरकार एक सुपरहिट सिनेमा

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक कुरबुरी झाल्या. यावर राऊत म्हणाले की, आमचे सरकार हे एका सुपरहिट सिनेमासारखे आहे. या कलाकृतीचा आनंद घ्या. मात्र ही कलाकृती बनविण्यासाठी पडद्यामागे काय हालचाली झाल्या, ते विचारू नका. त्या हालचाली आता पडद्यामागेच राहू द्या. तसेच आमच्याकडे आलेली खाते कमी महत्त्वाची आहेत, असे नाही. प्रत्येक खातं हे महाराष्ट्रातील जनतेशी निगडीत आहे. गृहखाते राष्ट्रवादीला दिले असले तरी सरकार आमचेच आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे म्हणजे ते फक्त शिवसेनेचेच नाहीत, तर संपुर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तसेच इतर मंत्रीही कोण्या एका पक्षाचे नसून राज्याचे आहेत, असेही राऊत म्हणाले.

 

First Published on: January 15, 2020 1:34 PM
Exit mobile version