शिवसेनेचे खासदारही वेगळ्या मार्गाच्या विचारात, ठाकरेंच्या बैठकीला फक्त 12 खासदार उपस्थित, 7 गैरहजर

शिवसेनेचे खासदारही वेगळ्या मार्गाच्या विचारात, ठाकरेंच्या बैठकीला फक्त 12 खासदार उपस्थित, 7 गैरहजर

मुंबईः शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारही बंडखोरी करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे 19 पैकी फक्त 12 खासदार उपस्थित राहिलेत, तर जवळपास 7 खासदार गैरहजर राहिल्यानं खासदारांच्या फुटीच्या वृत्ताला बळ मिळाले आहे.

शिवसेनेच्या एकूण 19 लोकसभा खासदारांपैकी 12 खासदार बैठकीला उपस्थित होते, तर 7 खासदार अनुपस्थित होते. शिवसेनेचे लोकसभेत 19 खासदार असून, राज्यसभेत तीन सदस्य आहेत. त्या 19 खासदारांपैकी गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत , विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, प्रताप जाधव, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावित हे उपस्थित होते. तर राज्यसभेत संजय राऊत, प्रियंका चतुर्वैदी आणि अनिल देसाई हे खासदार आहेत. परंतु संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित असल्या तरी शिवसेनेचे खासदार अनिल देसाईसुद्धा बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. कारण ते दिल्लीत असल्याचं सांगितलं जात आहे.

तर यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी, परभणीचे खासदार संजय जाधव, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, दादरा-नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर या अनुपस्थित होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे शिवसेनेने पाचच दिवसांपूर्वी भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोदपदावरून हटवून राजन विचारे यांची लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली. मात्र तरीही 19पैकी 14 खासदार ‘उठाव’ करण्याच्या तयारीत असून, स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्या, अशी विनंती ते येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रपती निवडणुकीतील भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून ते शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावण्याची शक्यता आहे.


हेही वाचाः लोकसभेतही शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर! 19पैकी 14 खासदारांचा स्वतंत्र गट?

First Published on: July 11, 2022 6:12 PM
Exit mobile version