होय, पवार-ठाकरे भेट झाली; माय महानगरच्या बातमीवर संजय राऊतांचे शिक्कामोर्तब

होय, पवार-ठाकरे भेट झाली;  माय महानगरच्या बातमीवर संजय राऊतांचे शिक्कामोर्तब

संजय राऊत यांचा पवार-ठाकरे भेटीला दुजोरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी काल राज्यपालांची भेट घेतल्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली, अशी बातमी माय महानगरने दिली होती. या बातमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शिक्कामोर्तब केले आहे. “मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली.”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देखील काल राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची ठाकरे भेट याबाबत योगायोग आहे का? अशी चर्चा सुरु असताना शिवसेनेचे नेते आणि खासदार राऊत यांनी आपल्या शैलीत ट्विट करुन विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. महाविकास आघाडी सरकार कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरले असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र हे सरकार मजूबत असल्याचे संजय राऊत यांचे म्हणणे आहे.

हे वाचा – गुप्त बैठकीसाठी शरद पवार मातोश्रीवर; महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?

विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे

संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावता म्हटले की, “करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे.. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. Boomerang… जय महाराष्ट्र”

तर कालच्या पवार – ठाकरे भेटीबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, “मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!”

हे देखील वाचा – ठाकरे सरकारवरील नाराजीचा उगम नेमका कुठून?

 

First Published on: May 26, 2020 10:46 AM
Exit mobile version