महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपला देण्यास शिवसेना तयार

महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपला देण्यास शिवसेना तयार

मुंबई महापालिकेत काँग्रेसला दाबण्यासाठी शिवसेनेने नवी खेळी सुरू केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद भाजपला देण्यास शिवसेना तयार झाली आहे. आमच्यावर दबाव टाकण्यासाठी शिवसेना ही खेळी खेळत असून दोन्ही जुने मित्र या निमित्ताने एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेतेपद मिळावे म्हणून भाजपने यापूर्वीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून कोर्टात त्यांची केस सुरू आहे. पण आता या प्रकरणात सेना भाजपला मदत करण्यास तयार झाली असून सेनेच्या या खेळीला आम्ही बळी पडणार नाही, असे रवी राजा यांनी स्पष्ट केले आहे.

प्रस्तावांबाबत गौप्यस्फोट
स्थायी समितीत येणार्‍या प्रस्तावांवरून रवी राजा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. स्थायी समितीत कोणताही प्रस्ताव आला की हा प्रस्ताव वरून आला, असे शिवसेना सांगत असते. वरून म्हणजे नेमका कुठून? मंत्रालयातून प्रस्ताव मंजूर करण्याचा आदेश आला की वर्षावरून हे मात्र शिवसेना सांगत नाही, असा दावाही रवी राजा यांनी केला आहे. पालिकेच्या प्रस्तावामध्ये मंत्रालयातूनच हस्तक्षेप होत असल्याचा अप्रत्यक्ष दावाच रवी राजा यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडतायत. आता पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद या वादाला कारणीभूत ठरले आहे.

शिवसेनेचे प्रत्युत्तर
रवी राजा यांनी जरी शिवसेनेवर आरोप केले असतील, तरी त्यांनी लक्षात घ्यावे की शिवसेनेमुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. शिवसेनेने सहकार्य केले नसते तर त्यांना हे पद मिळाले नसते. पण ते आज असे का बोलतायत माहीत नाही, महाविकास आघाडीवर याचे परिणाम होतील, असे म्हणत असतील तर त्यांनी धमकी तर मुळात देऊच नये, असे शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सुनावले आहे.

First Published on: January 5, 2021 6:49 AM
Exit mobile version