अकोल्यातील शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखावर ‘कमिशन एजंट’ असल्याचा आरोप; नेमके प्रकरण काय?

अकोल्यातील शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखावर ‘कमिशन एजंट’ असल्याचा आरोप; नेमके प्रकरण काय?

अकोला जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद आता टोकाला पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्यावर विकास निधीचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात अकोल्यातील बाजोरियांवर नाराज पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलडाणा येथे भेट घेतली. त्यावेळी या पदाधिकाऱ्यांनी बाजोरियांची लेखी तक्रार जाधव यांच्याकडे केली आहे.

माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांच्या तक्रारीत ‘कमिशन एजंट’ असा गंभीर उल्लेख करण्यात आला. बाजोरिया यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला 15 कोटी आणि 20 कोटींचा विकासनिधी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला विकल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे. (shiv sena shinde group fight broke former mla gopikishan bajoria accused of being a commission agent)

पदाधिकाऱ्यांच्या पत्रात काय?

मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांना 11 फेब्रुवारी रोजी हे पत्र पाठविण्यात आले. यासंदर्भात अकोल्यातील बाजोरियांवर नाराज पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलडाणा येथे भेट घेत हे पत्र सोपविले आहे.

या पत्रावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष निखिल ठाकूर, नितीन मानकर, अकोला पश्चिम शहरप्रमुख मुरलीधर सटाले, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, ललित वानखडे, वैद्यकीय आघाडी प्रमुख गजू मोर, बार्शीटाकळी तालूकाप्रमुख उमेश कोकाटे आणि अकोट तालूकाप्रमुख प्रकाश पाटील अशा 13 पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेले पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद वेळीच मिटवण्याचे आव्हान नेत्यांपुढे उभे ठाकले आहे.

दरम्यान, माझ्यावर लागलेल हे आरोप राजकीय द्वेषातून झाले आहेत. काही नवीन चेहऱ्यांना पक्षात आणल्यामुळे या पदाधिकाऱ्यांना ते रूचले नाही. त्यातूनच हे सर्व तथ्यहीन आरोप आपल्यावर लावण्यात आले आहेत. यातील एकही आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेऊ, असं या आरोपांवर स्पष्टीकरण देतांना गोपीकिशन बाजोरिया म्हणाले.


हेही वाचा – ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

First Published on: February 12, 2023 8:56 AM
Exit mobile version