महाराष्ट्र सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गट बाजू मांडणार

महाराष्ट्र सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गट बाजू मांडणार

नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आज, १४ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणात ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युक्तिवाद सुरू आहे. शिंदे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर ठाकरे गटाकडून त्याचे प्रत्युत्तर सादर केले जाईल. त्यामुळेआजच्या सुनावणीत शिंदे गटाकडून काय युक्तिवाद होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गेल्यावर्षी महाराष्ट्रात सत्ता बदल झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यांना ४० आमदारांचा पाठिंबा मिळाला. या सर्वांनी एकत्र येत भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या सत्ता बदलाची सध्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. सत्ता बदल होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक १६ आमदारांवर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केलेली अपात्रतेची कारवाई, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विशेष अधिकार यासह विविध मुद्द्यांवर ही सुनावणी सुरु आहे.

या सुनावणीत ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. माजी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री शिंदे समर्थक आमदारांवर केलेली अपात्रतेची कारवाई कशी योग्य हे ज्येष्ठ वकील सिब्बल यांनी न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. सत्ता बदल होत असताना त्यावेळचे राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका कशी संशयास्पद होती हेही ज्येष्ठ वकील सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

मात्र उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जायला हवे होते. बहुमत चाचणी झाली असती तर सर्व चित्र स्पष्ट झाले असते, असे मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केले. त्यानंतर मुख्यंमत्री शिंदे यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. आमचा विरोध उद्धव ठाकरे यांना कधीच नव्हता. आमचा विरोध महाविकास आघाडीला होता. आम्ही भाजपसोबत निवडणुकीला सामोरे गेलो. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्तेत बसणे आम्हाला मान्य नव्हते. याच कारणामुळे सत्तेतून बाहेर पडत आम्ही भाजपला पाठिंबा दिला, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. आजच्या सुनावणीत शिंदे गट अजून कोणते मुद्दे न्यायालयासमोर मांडणार हे बघावे लागेल.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या याचिकेवरही आज सुनावणी

स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याच अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे. सकाळच्या सत्रात या याचिकेबाबत आज मेन्शनिंग होऊन सर्वोच्च न्यायालय पुढील तारीख देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First Published on: March 14, 2023 7:30 AM
Exit mobile version