२०१४ साली शिवसेनेने काँग्रेसकडे मागितला होता पाठिंबा; पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

२०१४ साली शिवसेनेने काँग्रेसकडे मागितला होता पाठिंबा; पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

Prithviraj Chavan

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग करुन शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न नवीन नसून २०१४ साली देखील शिवसेनेने काँग्रेसकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव मांडला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. एका वृत्तासंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये चव्हाण यांनी याबाबत खुलासा केला आहे. मात्र आम्ही निवडणुकीत पराभूत झालो असल्याने विरोधातच बसू, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव फेटाळला असल्याचे सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, २०१४ साली देखील भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसकडे पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे संपर्क साधला होता. मात्र त्यावेळी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास सोनिया गांधी इच्छुक नव्हत्या. त्यामुळे आम्ही सदर प्रस्ताव फेटाळून लावला होता. २०१९ मध्ये मात्र परिस्थिती वेगळी होती. यावेळी देखील सोनिया गांधी आणि काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी अनुकूल नव्हतो. मात्र चर्चा पुढे गेली असल्यामुळे निर्णय घ्यावा लागला.

हे वाचा – सुधीर मुनगंटीवारांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार बंगल्याविना

तसेच भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचाही प्रयत्न झाल्याचा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. भाजप-सेनेत वाद निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राला पर्यायी सरकार देण्यासाठीच यावेळी शिवसेनेसोबत हातमिळवणी करुन महाविकास आघाडीचा जन्म झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपद मीच नाकारले

दोन दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदाबाबात मोठे वक्तव्य केले होते. शरद पवार यांनीच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष होऊ दिल नाही, असे ते म्हणाले होते. यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण म्हणाले की, मला राजकारणात सक्रिय राहायचे असल्याकारणाने विधानसभा अध्यक्षपदाचा प्रस्ताव मीच नाकारला. तसेच दुय्यम मंत्रिपदावर काम करणे योग्य वाटत नसल्यामुळेच मंत्रिपदही घेतले नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

First Published on: January 20, 2020 9:22 AM
Exit mobile version