हैदराबादपेक्षा अधिक कडक कायदा करु – मुख्यमंत्री

हैदराबादपेक्षा अधिक कडक कायदा करु – मुख्यमंत्री

‘वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कोणतीही दया माया दाखवली जाणार नाही. पीडितीच्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल आणि हैदराबादपेक्षा अधिक कडक कायदा महाराष्ट्रात करु. त्याचप्रमाणे गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू’, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. हिंगणघाट जळीतकांडातील मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडितेचा आज, सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेली पीडितीची झुंज आज अखेर अपयशी ठरली. दोन दिवसांपासून पीडितीचा रक्तदाब कमी – जास्त होत असल्यामुळे तिची प्रकृती खालावली होती. त्यामुळे या पीडितीला गेल्या दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, हृदय, यकृत, मृत्रपिंड असे सर्वच अवयव निकामी झाल्याने या पीडितीचा अखेर आज मृत्यू झाला.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘आरोपीला कोणतीही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. त्याचप्रमाणे निकाल लागला तरी देखील त्या आरोपीला शिक्षा होण्यास वेळ लागतो. मात्र, या घटनेत असे होऊ देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू’, अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

काय आहे हिंगणघाट प्रकरण

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे यांने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे याने तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरूणीने आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.


हेही वाचा – हिंगणघाट प्रकरण : ग्रामस्थांचा आक्रोश; रुग्णवाहिका, पोलिसांवर दगडफेक!


 

First Published on: February 10, 2020 2:48 PM
Exit mobile version