कुणाच्या पाठीत वार करायचा नाही, केला तर..,शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर

कुणाच्या पाठीत वार करायचा नाही, केला तर..,शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले आहेत. दसरा मेळाव्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून ताकद पणाला लावली जात आहे. दोन्ही गटातून पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर जारी करण्यात आला असून शिंदे गटाला थेट आव्हान देण्यात आलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमींना दसरा मेळाव्यात उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. गुलाल उधळत या.., असं देखील त्यांना सांगण्यात आलं आहे. छत्रपतींनी आपल्याला शिकवलं आहे. एक तर कुणाच्या पाठीत वार करायचा नाही, कुणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही. माझ्या हातात काय आहे, अधिकार म्हणून काहीच नाहीय पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेली शक्ती आहे. तीच शक्ती घेऊन मी पुढे चाललोय, लढायला चाललोय., असं या टीझरमध्ये म्हटलं आहे.

ही तीच शिवसेना आहे बघा गच्च भरलेली आहे. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. हे ठाकरे कुटुंब आहे संपवा, हे माझं ठाकरे कुटुंब आहे. या प्रत्येकाच्या हृदयात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटुन पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट बघतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतोय, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केलंय.

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होणार आहे. दोन्ही गटातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून शिवसेनेतील दोन्ही नेते काय बोलणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा : चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरही आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक, पुणे वाहतूक पोलिसांची माहिती


 

First Published on: October 3, 2022 12:58 PM
Exit mobile version