‘फडणवीसांनी आता मुंगेरीलालची स्वप्नं पाहावीत!’

‘फडणवीसांनी आता मुंगेरीलालची स्वप्नं पाहावीत!’

राज्यात सत्तेत असणारं महाविकासआघाडीचं सरकार फार काळ नाही टिकणार अशी अटकळ प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अनेकांनी बांधली आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातून देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. खुद्द विधानसभा विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मात्र, त्याला आता शिवसेनेचे आमदार आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समाविष्ट झालं होतं. त्यावरून ‘उद्धव ठाकरे हे आता लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंगेरीलाल के हसीन सपनेच पाहावेत’, असा टोमणा गुलाबराव पाटील यांनी हाणला आहे.

नुकतीच देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला जाऊन अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीवरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने ऑपरेशन लोटस राबवलं गेलं, तसाच प्रकार महाराष्ट्रात देखील घडेल की काय? अशी चर्चा देखील सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमधले आरोप-प्रत्यारोप वाढू लागले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजप नेते नारायण राणे यांनी देखील हे सरकार लवकरच पडेल असं भाकित केलं होतं. त्याचा देखील गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला. ‘नारायण राणे आणि प्रवीण दरेकर आधी कुठे होते आणि आत्ता कुठे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही’, असं ते म्हणाले.

दरम्यान, ‘भाजपनं हे सगळं करण्यापेक्षा आपले आमदार सांभाळावेत. भाजपचे किती आमदार त्यांच्यासोबत राहतील हे दिसेलच’ असा टोला देखील त्यांनी लगावला.

First Published on: July 18, 2020 12:12 PM
Exit mobile version