मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचे आमदार देणार राजीनामा

मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना मराठा समाजाच्या संदर्भातील भूमिका पक्षाने घ्यावी अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. शिवसेनेच्या ६४ आमदारांपैकी १५ मराठा आमदारांनी मराठा आरक्षणावर ठोस भूमिका पक्षाने घेतली पाहिजे असा आग्रह धरला आहे. शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे आमदार हेमंत पाटील यांनी ‘माय महानगर’ला प्रतिक्रिया देताना ‘समाजापुढे आमदारकी शून्य आहे’ असे म्हणत ‘जर आरक्षणावर योग्य निर्णय झाला नाही तर राजीनामा देईन’, असं वक्तव्य केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी अट घालत ६४ पैकी १५ आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेना यावर नेमकी काय भूमिका घेते? याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. येत्या दोन दिवसांत शिवसेनेचे आमदार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

आरक्षणावरुन ७ आमदारांचे राजीनामे

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय ७ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. पहिला राजीनामा शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे. या आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे शिवसेनेच्या मराठा समाजाच्या वोटबँक राजकारणात दबाव वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरुन आंदोलने करायला सुरुवात केली. पण मराठा समाजातील काकासाहेब शिंदे या तरुणाच्या जलसमाधीनंतर मात्र या आंदोलनाला गंभीर स्वरुप यायला सुरुवात झाली. ठिकठीकाणी केलेल्या बंददरम्यान काही प्रमाणात नुकसानसुद्धा झाले पण तरी सरकार कोणतीच भूमिका घेत नसल्यामुळे मराठा आमदारांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे.

उद्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून उद्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आरक्षणावर तोडगा निघणार का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप तरी गुलदस्त्यात असले तरी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी सरकार आरक्षण देण्यास सक्षम असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा दावा कितपत खरा ठरणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

First Published on: July 27, 2018 6:34 PM
Exit mobile version