विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळणार असेल तर केंद्राने तसं जाहीर करावं; राऊतांचा फडणवीसांना टोला

विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळणार असेल तर केंद्राने तसं जाहीर करावं; राऊतांचा फडणवीसांना टोला

विरोधकांची आदळआपट म्हणजे वादळ नाही, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यापासून विरोधी पक्षाकडून टीका-टिप्पणी केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कालच्या भेटीवर वक्तव्य करत आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता, असं म्हटलं होतं. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळणार असेल तर केंद्राने तसं जाहीर करावं, असा सणसणीत टोला फडणवीसांना हाणला.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं. या भेटीकडे सकारात्मदृष्ट्या पाहायला हवं. राज्याला मदत मिळावी यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा कारण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. मेट्रो कारशेडच्या प्रलंबित मुद्दयावर देखील सकारात्मक चर्चा झाली. मात्र असे असताना विरोधी पक्ष आम्हाला नेलं असतं तर बरं झालं असतं असे म्हणत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षसोबत असल्यावरच राज्याला मदत मिळणार असेल तर तसं केंद्रानं स्पष्ट करावं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि सूचना देण्याबाबतही सुचवले. केंद्रात भाजपचेच सरकार आहे. काही गोष्टी शासकीय असल्याने त्या केंद्राकडे घेऊन जाव्या लागतात. तसेच राज्याच्या अडचणी केंद्रापुढे मांडाव्या लागतात. विरोधी पक्षनेते जाणकार असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि सूचना द्यायला हव्यात, असे राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊत हे आजपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. इतर गोष्टी होतच राहतील. पक्ष वाढवणे गरजेचे असून त्यासाठी हा दौरा आहे, असे ते म्हणाले.

 

First Published on: June 9, 2021 3:35 PM
Exit mobile version