शिवसेनेच्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी उठाव – उदय सामंत

शिवसेनेच्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी उठाव – उदय सामंत

जी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. तीच भूमिका पुण्यातील शिवसैनिकांनी घेतला आहे. बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची शिवसेना प्रामाणिकपणे पुढे घेऊन जाण्याचा विचार आम्ही सर्वांनी घेतला आहे. त्याचं समर्थन पुणे जिल्ह्यातून होताना पहायला मिळत आहे. हा शिवसेनेच्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी उठाव होता. त्यामुळे मला शिवसेना ताब्यामध्ये घ्यायची आहे, असं कुठेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं नाहीये, असं शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत म्हणाले.

शिवसेनेच्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी उठाव

दोन वर्षांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत पाच जागा आम्ही लढलो होतो. त्यामध्ये एक जागा शिवसेना लढली आणि इतर चार जागा आमचे घटकपक्ष लढले होते. घटक पक्षांच्या चारही जागा निवडून आल्या पण शिवसेनेची जागा पराभूत झाली. पराभूत झालेल्या जागेवर ज्या ठिकाणी अपक्ष आमदार निवडून आले होते. ते आठ दिवसानंतर काँग्रेसमध्ये गेले. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीत संजय पवारांना ४३चा कोटा दिल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले. त्यामुळे या मोहिम आणि उठावात आम्ही सामील होतो. हा शिवसेनेच्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी उठाव होता. त्यामुळे मला शिवसेना ताब्यामध्ये घ्यायची आहे, असं कुठेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं नाहीये. तसेच आमच्यामध्ये चर्चा देखील झालेली नाही. हे गैरसमज पसरवण्याचं कोणीतरी केलेलं षडयंत्र आहे, असं उदय सामंत म्हणाले.

जी मोहिम शिंदेंनी आखली त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत कुणीही वाईट वक्तव्य केलेलं नाही. उद्धव ठाकरेंचा आदर आम्हाला कालही मनात होता. आजही आहे आणि उद्याही राहील. आमचा उठाव हा प्रवृत्तीच्या विरोधात होता. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता. तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी देखील होतो. शिवसैनिकांना जसं दुख: झालं होतं. तसेच दुख: माझ्यासारख्या सुद्धा शिवसैनिकाला झालंय. त्यामुळे घटक पक्षाच्या वाईट नजरेतून आणि विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जी मोहिम शिंदेंनी आखली होती. त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असं उदय सामंत म्हणाले.

पुण्यातील किती पदाधिकारी तुमच्यासोबत?

पुण्यातील पदाधिकाऱ्यांची यादी आम्ही काहीही केलेली नाहीये. परंतु १८ जुलै रोजी हे चित्र स्पष्ट होईल की, मोठ्या संख्येने शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यासाठी मुंबईला पोहोचतील. पहिली आणि दुसरी शिवसेना असा गट आम्ही तयार केलेलाच नाही. आम्ही शिवसेनेचे आहोत. कारण शिवसेनेचं कोणतही काम आम्ही करणार नाही, असं माझ्या सहकार्याकडून कधीच झालेलं नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेचेच असून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलाय. त्याचं सन्मान करण्यासाठी पुण्यातील सर्व शिवसैनिक मुंबईला जाणार आहेत, असं सामंत म्हणाले.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री, विनायक मेटेंचं मोठं वक्तव्य


 

First Published on: July 16, 2022 4:55 PM
Exit mobile version