औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपवाल्यांनी वळवळ करू नये – सामना

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपवाल्यांनी वळवळ करू नये – सामना

संग्रहित छायाचित्र

अनेक वर्षांपासून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे, अशी मागणी शिवसेना करत आहेत. पण आता शिवसेनेच्या या मागणी काँग्रेसने विरोध केला आहे. संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल, असे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले होते. यामुळे आता महाविकास आघाडीमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून नेहमीप्रमाण भाजपवर निशाणा साधला असून अनेक भाजपला सवाल केले आहेत. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूंप्रमाणे वळवळ करू नये, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

नक्की सामना अग्रलेखात काय म्हटले आहे?

‘महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱ्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे आणि सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील आणि औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे!’

यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या

‘औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करून टाकले आणि जनतेने ते स्वीकारले. त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत. निदान या विषयावरून सरकारात ठिणगी तरी पडेल, असे काही लोकांना वाटत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे संभाजीनगरात गेले व त्यांनी जाहीर केले, औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला काँग्रेसचा विरोधच असेल! हा थोरातांचा दावा आहे. यावर भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचा घोर लागला आणि आता शिवसेना काय करणार? असा प्रश्न चंद्रकांत पाटील वगैरे लोकांनी विचारला आहे.’

चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी शिवसेना आतापर्यंत आग्रही राहिली आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने नामांतरास विरोध केल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा भाजपचा आग्रह आहे. यात भूमिका स्पष्ट करावी असे काय आहे? शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपास त्याची काळजी नको. औरंगाबादचे संभाजीनगर हा लोकनिर्णय आहे. जे निजामी अवलादीचे आहेत ते औरंग्यापुढे आजही गुडघे टेकत असतील तर तो त्यांचा प्रश्न. आता प्रश्न राहिला भाजपच्या थयथयाटाचा. अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामांतर होऊ शकते, तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. त्यांच्या या तल्लख बुद्धीचातुर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, असा थेट हल्लाबोल सामनातून चंद्रकांत पाटलांवर करण्यात आला आहे.


हेही वाचा – कोरोनात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केले असते तर?


 

First Published on: January 2, 2021 9:05 AM
Exit mobile version