काय सांगता? उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनांसाठी युती केली?

काय सांगता? उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनांसाठी युती केली?

उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यानंतर विरोधकांनी दोन्ही पक्षांवर टीकेची झोड उठवली. विशेषत: शिवसेनेवर निशाणा साधत ‘इडीच्या भितीमुळेच शिवसेनेने युती केली’, अशी टीका देखील करण्यात आली. मात्र, आता शिवसेनेने युती का केली? याचं स्पष्ट कारण समोर आलं आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनीच ते कारण सांगितलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावलेल्या स्नेहभोजनादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांसमोर युतीचं कारण जाहीर केलं आहे. आणि हे कारण दुसरं-तिसरं कुठलं नसून, ते आहे स्वत: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन!


तुम्ही हे वाचलंत का? – वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनात काय घडलं?

मला गिरीश महाजन हवेत – उद्धव ठाकरे

यावेळी उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्षाच्या आमदारांना येणाऱ्या निवडणुकांसाठी तयार राहाण्याचं आवाहन केलं. त्यानंतर त्यांनी ‘युतीचं खरं कारण काय आहे ते सांगू का?’ असं विचारताच खुद्द मुख्यमंत्र्यांसकट सगळ्यांमध्येच हशा पिकला. ‘आम्ही युती केली कारण आम्हाला तुमचा एक माणूस हवा आहे. आम्हाला गिरीश महाजन हवे आहेत. बारामतीसकट सगळा महाराष्ट्र जिंकायचा आहे. म्हणून आम्हाला गिरीश महाजन हवे आहेत’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच मुख्यमंत्रीही खळखळून हसायला लागले.

घटकपक्षांच्या नाराजीचं काय?

दरम्यान, या स्नेहभोजनासाठी सत्तेतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही घटकपक्षांचे महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित होते. मात्र, रिपाइंचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रासपचे महादेव जानकर आणि रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत या घटकांना मात्र या स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे एकीकडे स्नेहभोजन सुरू असताना दुसरीकडे या घटकपक्षांनी पत्रकार परिषद घेऊन ‘युती करताना आमचा विचार करायला हवा होता’, असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.

First Published on: February 26, 2019 2:11 PM
Exit mobile version