सम-विषम पद्धतीला दुकानदार, व्यापार्‍यांचा विरोध

सम-विषम पद्धतीला दुकानदार, व्यापार्‍यांचा विरोध

Shopkeepers and traders oppose the even-odd system

तुषार रौंदळ : विरगाव

सटाणा शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व्यावसायिकांनसाठी सम-विषम पद्धत लागू केली आहे. मात्र, ही पद्धत व्यापारी वर्गाच्या मुळावर तर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. तसेच सम-विषम पद्धतीचा अवलंब केला गेला असला तरी बाजारपेठांमधील गर्दी कमी होत असल्याचे दिसत नाही. मग या पद्धतीचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित करत सम-विषम पद्धत मोडीत काढून सर्व आस्थापना सकाळी ९ ते ४ सुरु ठेऊन नंतर संचारबंदी करावी अशा आशयाचे निवेदन शुक्रवारी (दि.३) माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सटाणा शहरातील व्यापारी वर्गाच्या वतीने तहसीलदार जितेंद्र इंगळे व पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना देण्यात आले.

सटाणा शहरात मागील १६ तारखेपासून प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांच्या आदेशानुसार शहरात दुकाने व आस्थापना सम-विषम पद्धतीचा अवलंब करत आहेत. परंतु शहरात सम-विषम पद्धतीचा अवलंब केला जात असूनही बाजारपेठेतील गर्दी कमी झालेली नाही. याउलट हॉकर्स व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांना कोणत्याही बंधणे नाहीत. व्यापारी वर्गाच्या मुळावर हे शासन उठले आहे का अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत.

या अनुषंगाने शनिवारी (दि.४)पासून शहरातील सम-विषम पद्धत बंद करुन सर्व व्यावसायिक सकाळी ९ ते ४ या वेळेत आपले व्यवसाय सुरू ठेवतील. त्यानंतर ५ वाजेपासून शहरात संचारबंदी ठेवू, अशी हमी व्यावसायिकांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना दिली. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, विलास बच्छाव, विजय वाघ, अरविंद सोनवणे, राजेंद्र सोनवणे, शरद तयार, रमणलाल छाजेड, अनिल बागूल, राजेंद्र बंब, मुन्ना रब्बानी, जगदीश मुंडावरे, विजय भांगडीया, विजय काला आदींसह व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांनी सम-विषम पद्धतीचा आदेश पारित केला आहे. त्यामुळे तुमच्या मागण्या व समस्यांची माहिती मी त्यांना देणार आहे. मात्र, अंतिम निर्णय तेच जाहीर करतील, अशी प्रतिक्रिया बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी यावेळी दिली.

First Published on: July 3, 2020 9:28 PM
Exit mobile version