राज्यात आठ लाख नवीन मतदार नोंदणी, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

राज्यात आठ लाख नवीन मतदार नोंदणी, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

राज्यात १ नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत राज्यात आठ लाख नव्या मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी बुधवारी येथे दिली . स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील मतदानासाठी हे नवे मतदार पात्र ठरतील, असेही देशपांडे यांनी सांगितले.

मतदार नोंदणी, मतदान याविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देशपांडे यांनी यावेळी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच ‘लेखक, भाषा आणि लोकशाही’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली .

निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो. पण लोकशाही रसरशीत राहावी यासाठी समाजातील सर्जनशील घटक विविध पातळ्यांवर काम करत असतात. सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा घटक असतो, लेखक आणि त्याची लेखणी. लेखकाची हीच भूमिका केंद्रस्थानी ठेवून या परिसंवादात ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, मराठी भाषेच्या चळवळीतले प्रा. कौतिकराव ठाले पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, पत्रकार आणि संपादक इब्राहीम अफगाण , दीप्ती राऊत आणि आपण स्वतः यात सहभागी होणार आहोत.

या परिसंवादाचे सूत्रसंचालन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार करणार आहेत. हा परिसंवाद परिसंवाद ४ डिसेंबर २०२१ रोजी सायं ५.३० ते ७.३० या वेळेत असेल Chief Electoral Officer Maharashtra या फेसबुक पानावरून आणि https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरूनही पाहता येणार आहे.
या संमेलनात मतदारांच्या जनजागृतीसंबंधी प्रकाशने आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खेळ यांचे दालनही असणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसंबंधी निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाला , मतदार जागृती मंच ही व्यासपीठे तयार केली आहेत. ही व्यासपीठे शाळा-महाविद्यालये, गावा-परिसरामध्ये, कार्यालयामध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तिकांही या दालनात उपलब्ध असतील. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मोठ्या संख्येने या दालनाला भेट देऊन लोकशाहीसंबंधीचे ल्युडो, सापशिडी यांसारखे खेळ तसेच व्यासपीठे समजून घ्यावीत, असे आवाहन श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी केले.

First Published on: December 1, 2021 7:51 PM
Exit mobile version