Sanjay Raut : मुख्यमंत्री कार्यालयातून 500 कोटी गोळा केले, संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेवर आरोप

Sanjay Raut : मुख्यमंत्री कार्यालयातून 500 कोटी गोळा केले, संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेवर आरोप

मुंबई : श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असल्याने त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे होते. पण या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे आणि त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान 500 कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत, असा थेट आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

या फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाऊंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशेबे धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत काय? याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे, असा दावाही खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार दिली आहे.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे इर्शाळवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे. तसेच या संकटामुळे अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारली आहे. ही बाब ही माणुसकी धरूनच आहे, परंतु अशा कार्यासाठी खूप मोठा निधी लागतो. हा निधी ज्या देणगीदारांकडून प्राप्त झाला असेल त्यांचा योग्य सन्मान आणि त्यांच्या दातृत्वाची पुरेशी प्रसिद्धी होणे उचित ठरेल, परंतु हा उपक्रम हाती घेताना शासकीय निधीचा वापर करून जर कोणी राजकीय व्यक्ती त्याचे श्रेय घेत असेल तर ते नुसते अनैतिक नसून गुन्हेगारी स्वरूपाचेदेखील आहे. यास मराठीमध्ये मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाणे असे म्हणतात, असे संजय राऊत यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : चंदा दो धंदा लो खेळाचे सूत्रधार मिंधे सरकारचे बाळराजे, राऊतांची पंतप्रधानांकडे तक्रार

नागरिकांना गणपतीच्या सणाला गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात त्यांच्या गाड्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला उपलब्ध करून दिल्याचे वर्तमानपत्रातून समजले. या गाड्यांचे पैसे प्राप्त झाले आहेत किंवा नाही याची माहिती करदात्या नागरिकांस होणे आवश्यक आहे. कारण जर पैसे प्राप्त झाले नसतील तर हा शासकीय निधीचा गैरवापर असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. निधी प्राप्त झाला असेल तर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून निधीच्या देणगीदारांची नावे प्रसिद्ध होणे किंवा नागरिकांना ही बाब समजणे आवश्यक आहे. देणगीदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला कोणत्या कारणासाठी पैसे देतात की धार्मिक बाब म्हणून कोट्यवधी रुपयांची दक्षिणा देतात, याचा खुलासा आवश्यक असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : श्रीकांत शिंदे फाऊंडेशच्या घोटाळ्याची चौकशी करा, राऊतांची मागणी


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 15, 2024 12:23 PM
Exit mobile version