सिद्धेश्वरचा पाझर तलाव धोकादायक

सिद्धेश्वरचा पाझर तलाव धोकादायक

सुधागड तालुक्यातील सिद्धेश्ववर बुद्रुक येथील मोठ्या पाझर तलावाची दुरवस्था झाल्याने तो धोकादायक झाला आहे. चिपळूणच्या तिवरे गावातील धरण दुर्घटनेप्रमाणे येथे तशी दुर्घटना घडू नये म्हणून या पाझर तलावाचे स्ट्रक्चरल ऑडिट व दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. या संदर्भातील निवेदन सोमवारी सरपंच उमेश यादव व ग्रामपंचायत सदस्य योगेश सुरावकर यांनी तहसीलदारांसह गट विकास अधिकार्‍यांना दिले आहे.

गावाच्या वरच्या बाजूला 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या या तलावाची आजतागायत डागडुजी व दुरुस्ती झालेली नसल्याने विस्तीर्ण भिंतीवर इतकी मोठी झाडे वाढली आहेत की त्यामुळे ही भिंतच दिसेनाशी झाली आहे. आता यापैकी अनेक झाडांची मुळे खोलवर जाऊन भिंतींचे दगड व त्याखालील माती निसटत आहे. तसेच काही ठिकाणी भिंतींचे दगड ढासळले असून, मातीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन वाहून गेली आहे. पाझर तलावाला काही ठिकाणी गळती लागली आहे. सध्या हा पाझर तलाव पाण्याने पूर्णपणे भरलेला आहे. परिणामी हा कमकुवत पाझर तलाव कधीही फुटू शकतो. त्यामुळे खाली वसलेल्या गावातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे वेळीच हा धोका ओळखून पाझर तलावाची (धरण) योग्य प्रकारे दुरुस्ती झाली पाहिजे, असे सुरावकर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

ग्रामस्थांकडूनच वेळोवेळी दुरुस्ती
दोन वर्षांपूर्वी या पाझर तलावाचा सांडव्याला गळती लागून तो कमकुवत झाला होता. त्यावेळी सर्व गावकरी जमा झाले आणि त्यांनी तब्बल 60 ते 70 हजार रुपये जमा करून सांडव्याची दुरुस्ती केल्याचे स्थानिक ग्रामस्थ अनंता साळसकर यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी तलावाच्या भिंतींच्या मातीची धूप होऊन खोल खड्डा पडला होता. तोही सरपंच, सदस्य व गावकर्‍यांनी एकत्रितपणे बुजविला आहे. पाझर तलावाच्या खाली असलेल्या ब्रिटिशकालीन बंधार्‍याची दुरुस्तीदेखील ग्रामपंचायतीनेच केली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाची काही जबाबदारी आहे की नाही, अस सवाल उपस्थित होत आहे.

विस्तृत आणि जुना असा हा पाझर तलाव कमकुवत झाला आहे. त्यामुळे वेळीच याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती आवश्यक आहे. तसे निवेदन तालुका प्रशासनाला दिले आहे. अपेक्षा आहे की, यावर वेळीच कार्यवाही होईल.
-उमेश यादव, सरपंच

First Published on: July 18, 2019 4:44 AM
Exit mobile version