अजित पवारांच्या फोन नंबरचा गैरवापर पुण्यातल्या बड्या बिल्डरला धमकी; ६ जणांना अटक

अजित पवारांच्या फोन नंबरचा गैरवापर पुण्यातल्या बड्या बिल्डरला धमकी; ६ जणांना अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरवरून पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला धमकीचा फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फोनवरून या बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल २० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ६ जणांना अटक केली. आरोपींना १० दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील एका बड्या बिल्डरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचे सांगणारा फोन आला होता. या फोनद्वारे बिल्डरकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून आरोपींनी त्यापैकी दोन लाख रुपये घेतले होते. ही गँग गुगल प्ले स्टोअरवर जाऊन फेक कॉल अ‍ॅपच्या सहाय्याने दुसर्‍याच्या नावाने कॉल करून धमकावत होती. याचप्रकारे आरोपींनी अजित पवारांच्या मोबाईल क्रमांकाचा देखील दुरूपयोग केला.

हा प्रकार मागील दहा दिवसांपासून १३ जानेवारीपर्यंत सुरू होता. अखेर बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पुण्याच्या बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी ३८४, ३८६, ५०६, ३४ आयटी अ‍ॅक्ट कलम ६६ (सी),(डी)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ६ जणांचा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच सर्व आरोपींना १० दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. यातील मुख्य आरोपीवर याआधी 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

आरोपींनी गुगल प्ले स्टोअरवरून फेक कॉल अ‍ॅप नावाचा अ‍ॅप डाऊनलोड केला. या अ‍ॅपच्या मदतीने अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करून व्यावसायिकाला धमकीचा फोन केला. अजित पवार यांचे पीए चौगुले असल्याचे सांगून २० लाखांच्या खंडणीची मागणी केली. एवढेच नाहीत तर बाडेबोलाइ येथील बाबा चोरमले आणि इतर 9 जणांच्या मालकीच्या जमिनीचा वाद मिटवून टाका असे फोनवरून व्यावसायिकाला सांगण्यात आले.

First Published on: January 15, 2022 6:10 AM
Exit mobile version