म्हैसकर दाम्पत्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांना पदोन्नती

म्हैसकर दाम्पत्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबईः भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९२ च्या तुकडीतील सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पदोन्नती मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी या संदर्भांतील आदेश जारी केले. या अधिकाऱ्यांना सध्या आहे त्याच पदावर बढती देण्यात आली आहे. यामध्ये म्हैसकर दाम्पत्याचाही समावेश आहे.

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये वित्त विभागाचे ओम प्रकाश गुप्ता, नियोजन विभागाचे राजगोपाल देवरा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिलिंद म्हैसकर, राजशिष्टाचार विभागाच्या मनीषा पाटणकर-म्हैसकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सीमा व्यास यांचा समावेश आहे. पदोन्नती मिळण्यापूर्वी हे अधिकारी प्रधान सचिव पदावर कार्यरत होते.

मिलिंद म्हैसकर हे 1992 च्या बॅचचे अधिकारी आहेत. तसेच मनीषा पाटणकर-म्हैसकर ह्या देखील 1992 बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांनी या आधी विविध खात्यांमध्ये काम केले आहे. मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष होते. तर मनिषा पाटणकर- म्हैसकर ह्या शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव होत्या. त्यांचा मुलगा मन्मथने २०१७ मध्ये आत्महत्या केली. त्या दुःखातून सावरत हे दाम्पत्य पुन्हा सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा आईबाबा होण्याचा निर्णय घेतला. सरोगसी पद्धतीने ते पुन्हा आईबाबा झाले आहेत. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत.

गेल्या नोव्हेंबरमध्येही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. वित्त विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांची ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवपदी तर ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली होती. वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांची परिवहन आणि बंदरे विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. पराग जैन यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या वस्त्रोद्योग विभागाचा अतिरिक्त कार्यभार उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आला होती.

First Published on: February 3, 2023 9:06 PM
Exit mobile version