आता ठाण्यातही नेहरू तारांगण

आता ठाण्यातही नेहरू तारांगण

आता ठाण्यातही नेहरू तारांगण

विश्वाचे रहस्य अतिशय खुमासदार आणि रंजक पद्धतीने उलगडून दाखविले जात असल्याने मुंबईतील नेहरू सेंटर येथील आकाश दर्शन प्रकल्प आबालवृद्धांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. आता लवकरच ठाण्यातही असे एक अद्यायावत आकाश दर्शन केंद्र कार्यान्वित होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून हा प्रकल्प साकारला जात आहे. साकेत येथील जैवविविधता उद्यानात हे केंद्र उभारले जात आहे. ठाण्यात दहा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खगोल विषयाची ओळख व्हावी म्हणून ‘तारांगण आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला होता. ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू होता. त्यासाठी एक स्वतंत्र वाहन नेमण्यात आले होते. त्याद्वारे ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ध्वनीचित्रफित आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून खगोल विषयाची ओळख करून दिली जात होती. पुढे हा उपक्रम बंद पडला. मात्र आता ठाण्यात दा. कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरूपी आकाश निरीक्षण केंद्र उभारले जात आहे.

‘असे’ असेल आकाश केंद्र

या आकाश निरीक्षण केंद्रात ५० आसनांचे लघु अवकाश निरीक्षण केंद्र असणार आहे. त्यात अवकाश, विश्वाची रचना, ग्रह, तारे, धूमकेतू, आकाशगंगा यांची ध्वनीचित्रफितीद्वारे माहिती दिली जाणार आहे. एका स्वतंत्र दालनात खगोलविषयक उपकरणे आणि साधनांची माहिती देणारे कायमस्वरूपी प्रदर्शन असेल. त्यात नासा, इस्त्रोचे संशोधन, त्यांची कार्यपद्धती, उपग्रहांची कार्यपद्धती, ग्रह, तारे, सूर्यमाला, ग्रहण आदी वैज्ञानिक संज्ञांचा सचित्र परिचय करून दिला जाईल. चांद्रभूमी, मंगळाचा पृष्ठभाग आदींची पार्श्वभूमी असलेला सेल्फी पॉईंटही या केंद्रात असणार आहे.

‘येऊर’ येथे प्रत्यक्ष आकाश दर्शन

या आकाश निरीक्षण केंद्रातील उपक्रमाचा एक भाग म्हणून येऊर येथून प्रत्यक्ष आकाश निरीक्षण करण्याची संधी खगोलप्रेमी मंडळींना मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यातील ‘माथेरान’ या पर्यटनस्थळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकाश निरीक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. त्या प्रकल्पात मार्गदर्शक म्हणून मी सहभागी होतो. ठाण्यातही अशा प्रकारचा प्रकल्प राबविण्याची इच्छा तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केली. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला. विद्यामान जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही या प्रकल्पात उत्सुकता दाखवली आहे. सध्या इथे तिसऱ्या खाडी पुलाचे काम सुरू आहे. उद्यानातील पुलाचे काम झाले की आकाश दर्शन प्रकल्प मार्गी लागेल.
– दा.कृ.सोमण, खगोल अभ्यासक
First Published on: May 1, 2019 5:03 PM
Exit mobile version