मोठ्या शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना, एमएमआरसाठी स्वतंत्र प्राधिकरण

मोठ्या शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना, एमएमआरसाठी स्वतंत्र प्राधिकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरात तसेच महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. मुंबई वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्यासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी स्ट्रेस फंड उभारण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले.

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यांसाठी पुनर्वसनाचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. स्ट्रेस फंडच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामासाठी बँकांकडून विकासकाला कर्ज उपलब्ध होईल आणि योजना गतीने पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कायद्यामध्ये जे काही बदल करणे गरजेचे आहे ते लवकरात लवकर केले जातील. तसेच स्ट्रेस फंड उभारण्याबाबत आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणला जाईल, असेगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. श्रीनिवास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी उपस्थित होते.

First Published on: July 31, 2020 8:04 PM
Exit mobile version