सोशल मीडिया की वर्तमानपत्र? राज ठाकरेंचं आवडतं माध्यम कोणतं?

सोशल मीडिया की वर्तमानपत्र? राज ठाकरेंचं आवडतं माध्यम कोणतं?

Raj Thackeray | पुणे – सोशल मीडियाचा प्रसार झाल्यापासून वर्तमानपत्रांचा वाचक वर्ग कमी झाला आहे. त्यामुळे पेपर हातात घेऊन वाचण्यापेक्षा वाचकवर्ग हातातील मोबाईलमधूनच बातम्या वाचतात. या सोशल मीडियाची भूरळ सर्वांनाच पडलेली असताना राज ठाकरे मात्र याबाबत खंत व्यक्त करतात. वर्तमानपत्रात व्यंगचित्र छापून येण्याची मजा सोशल मीडियावर नाही, असा खेद ते व्यक्त करतात. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केलेल्या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात ते बोलत होते.

राज ठाकरे हे उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंचं व्यंगचित्र प्रसिद्ध झालेलं नाही. २०१८-१९ मध्ये राज ठाकरेंनी सरकारवर फटकेबाजी करण्याकरता काही व्यंगचित्रे प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यानंतर त्यांची फारशी व्यंगचित्रे बाहेर आली नाहीत. त्यामुळे, राज ठाकरे आता व्यंगचित्रे रेखाटतात की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावर राज ठाकरे म्हणाले की, “मी बऱ्यांच दिवसांत हातात ब्रश किंवा पेन्सिल घेतलेला नाही. याचं कारण असं की पूर्वी वर्तमानपत्रात व्यंगचित्र छापून येण्याची मजा वेगळी होती. वर्तमानपत्रात छापून येण्याची मजा सोशल मीडियावर नाही. मी व्यंगचित्र काढतो, पण सगळीच व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध करत नाही.”


व्यंगचित्र कलेला परदेशातही अवकळा आली आहे. सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स चॅनेलमुळे व्यंगचित्र मागे पडली, असं सांगतानाच व्यंगचित्र रेखाटण्यासाठी कल्पना, कॉमेंट आणि ड्रॉईंग उत्तम असणे गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

१९९५ च्या नंतर स्थितंतराचा काळ होता. कारण त्याच काळात इंटरनेट, चॅनेल्स आलेत. त्यामुळे तो वेग आला. आयुष्याला वेग आला. त्या वेगाची सुरुवात एमटीव्हीपासून झाली. ९५ नंतरच्या काळात इंटरनेट येणं, चॅनेल्स, सोशल मीडिया, मोबाईल फोन्स आले. या आधीच्या काळात तुमच्या आयुष्याला शांतता होती. तुम्हाला विचार करायला वेळ होता. पण १९९५ नंतर शहरांची वाताहत झाली. बेसुमार वाढ झाली. वातावरणातील शांतपणा गेला आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा राज्यपालांबद्दल बोलताना संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली, म्हणाले…

मराठी कार्टुनिस्ट जागतिक पातळीवर का पोहोचले नाहीत?

मराठी कार्टुनिस्ट जागतिक पातळीवर कमी पोहोचले. जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी जागतिक विषयांची व्यंगचित्र काढायला पाहिजे, त्यासाठी जागतिक पातळीवरचा अभ्यास असावा लागतो. अभ्यासाशिवाय कल्पना सूचत नाहीत. त्यामुळे व्यंगचित्र पोहोचत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

First Published on: January 8, 2023 12:24 PM
Exit mobile version