अफवांचे आणखी ५ बळी.. हे सत्र थांबणार कधी?

अफवांचे आणखी ५ बळी.. हे सत्र थांबणार कधी?

प्रातिनिधिक छायाचित्र

सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नका, असे वारंवार सांगून सुद्धा अनेक बातम्या चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशीच एक चुकीची बातमी ५ जणांच्या जीवावर बेतली आहे. धुळ्यातल्या साक्री गावात अशीच एक घटना घडली आहे. मुलं पळविणारी ही माणसे असल्याचे सांगत गावात आलेल्या ५ जणांना गावकऱ्यांनी इतका बेदम मार दिला की, या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. साक्री येथील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला असून जमावाने त्यांना इतके मारले आहे की, त्यांचे चेहरे ओळखण्यास अनेक अडचणी पोलीसांना येत आहेत.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

विशेष म्हणजे अशा घटना घडत असताना त्या थांबवायच्या सोडून किंवा त्या बातमीमागची सत्यता शोधून काढण्याचे सोडून जमावाकडून अशा संशयितांना मारतानाचा व्हिडिओ तयार केला जातो. त्यामुळे या व्हिडिओ करणाऱ्यांची अधिक कीव येते. याआधीही देशात झालेल्या अशा काही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशा व्हिडीओने अनेकवेळा लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरवले आहे.

देशात आतापर्यंत ४ घटना

देशभरात लहान मुलांना पळविण्याच्या संशयावरुन लोकांना पकडल्याच्या किंवा त्यांना मारहाण केल्याच्या, आतापर्यंत  ३ घटना झाल्या आहेत. यामध्ये जमावाने अफवांवर विश्वास ठेवत संशयितांना मारल्याची घटना घडली आहे. मात्र, एकाचवेळी ५ जणांचा जीव जाण्याची ही पहिलीच घटना आहे. धुळे जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना खरोखरच लाजीरवाणी म्हणावी लागेल. एखाद्या अफवेवर विश्वास ठेवून अशाप्रकारे एक-दोन नाही तर तब्बल ५ लोकांना जीवे मारणे हा प्रकार खरोखरंच हादरवणारा आहे. या प्रकरणात आपली काहीही चूक नसताना या ५ लोकांना नाहक आपला प्राण गमवावा लागला आहे.

दरम्यान लोकांना कधी अक्कल येणार? अफवा आणि सत्य यातील फरक लोकांना कधी समजणार आणि मुख्य म्हणजे अशाप्रकारे हकनाक जाणारे बळी कधी थांबणार? असे प्रश्न देशभरातील लोक सोशल मीडियाद्वारे उपस्थित करत आहेत.

 

First Published on: July 1, 2018 7:17 PM
Exit mobile version