भाजपचं ऑपरेशन विखे पाटीलनंतर ऑपरेशन मोहिते पाटील

भाजपचं ऑपरेशन विखे पाटीलनंतर ऑपरेशन मोहिते पाटील

रणजितसिंह मोहिते पाटील

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचं ऑपरेशन विखे-पाटील संपल्यानंतर आता ऑपरेशन मोहिते-पाटील सुरु झाले आहे. काल उशिरा रात्री मुंबईत रणजित सिंह मोहिते पाटील यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी अकलूजमध्ये मोहिते-पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये बैठक होणआर आहे. या बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते- पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे मात्र कोणत्या पक्षाकडून ही निवडणूक लढवणार हे आज स्पष्ट होईल.

बैठकीनंतर होणार निर्णय 

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असल्या तरी माढा मतदारसंघाचा पेच कायम आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार कोण? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला देखील वेग आला आहे. आज अकलूजमध्ये मोहिते-पाटील समर्थकांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच रणजितसिंह मोहिते-पाटील पुढची दिशा ठरवणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली होती. त्यावेळीही ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती. आज त्यावर निर्णय होईल.

रणजितसिंह यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. जिल्ह्यातील महाआघाडीचे नेते आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत या नेत्यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत बोलावून घेतले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. पण त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातच रस असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

First Published on: March 19, 2019 11:18 AM
Exit mobile version