खाजगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आलेले काही रिपोर्ट निगेटिव्ह निघाले

खाजगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आलेले काही रिपोर्ट निगेटिव्ह निघाले

आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती

काही खासगी लॅब सरकारी यंत्रणांना करोनाच्या संशयित रुग्णांचे अहवाल वेळेत देण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यांच्याकडून प्राप्त झालेले चाचणी अहवाल सरकारकडून चालवण्यात येणार्‍या लॅबमध्ये पुन्हा तपासले जात आहेत. काही खासगी लॅबमधून रुग्णांचे आलेले करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते, ते सरकारी लॅबमध्ये पुन्हा चेक केले असता, निगेटिव्ह आले, तर काही निगेटिव्ह आलेले अहवाल पुनर्तपासणीनंतर पॉझिटिव्ह आल्याचे उघड झाले आहेत, अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील ५ हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. हे सर्व जण करोनाबाधित रुग्णांच्या अतिधोक्याच्या संपर्कात आले होते. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिल्यानंतर राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे १६२ करोनाबाधित झाले आहेत. सुदैवाने या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून संसर्ग वाढण्याचा धोका टाळता येणार आहे, असा इशाराही राजेश टोपे यांनी दिला आहे.

काही खासगी लॅबकडून वेळेत अहवाल प्राप्त होत नाहीत. अहवाल देण्यासाठी सामान्यतः एक ते दोन दिवस घेतले जातात, असंही त्यांनी सांगितलं. कदाचित खासगी लॅबमध्ये किट्स उपलब्ध नसल्यामुळे तपासणीला विलंब होतो. नमुन्यांच्या तपासणीला अधिक कालावधी लागल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. अचूक अहवाल देणार्‍या खासगी लॅबमध्ये करोनासंदर्भात चाचणी करण्यास मनाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on: April 2, 2020 7:10 AM
Exit mobile version