कुणी केली गद्दारी? नंदेश उमप यांच्या जबरदस्त आवाजात शिंदे गटाकडून टीकात्मक गीत प्रदर्शित

कुणी केली गद्दारी? नंदेश उमप यांच्या जबरदस्त आवाजात शिंदे गटाकडून टीकात्मक गीत प्रदर्शित

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांवर उद्धव ठाकरेंसह अनेकांनी गद्दारीचा आरोप केला. ५० खोके एकदम ओके म्हणत शिवसेनेने पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा परिसर दणाणून सोडला होता. यावरून एकनाथ शिंदे यांच्या गटाने आता एक गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्यातून त्यांनी गद्दारी कोणी केली हे काव्यातून मांडलं आहे. कुणी केली गद्दारी असे त्यांचे गाण्याचे बोल असून त्यांनी या गाण्यातून शिवसेनेसह संपूर्ण महाविकास आघाडीवर तोफ डागली आहे.

हेही वाचा -उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला सुरुवात, किशोरी पेडणेकरांनी शिंदेवर डागली तोफ

काँग्रेसच्या पाहुणीला, राष्ट्रवादीच्या दावणीला, भ्रष्टवादी छावणीला, शिवसेना नेली, कुणी केली गद्दारी? असे या गाण्याचे बोल असून प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्या जबरदस्त आणि बहारदार आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे.

या गाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणांचेही दाखले देण्यात आले आहेत. त्यांच्या भाषणातील मुद्दे घेत, बाळासाहेबांनी मांडलेल्या भूमिकांचीही आठवण या गाण्यातून देण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संसार थाटणे हीच खरी गद्दारी नाही असंही या गाण्यातून विचारण्यात आलं आहे. छगनराव मजल करी, सायबांना वॉरंट काढी, चीड येते आठवुनी, सायबांची गिरफ्तारी, कोणी केली गद्दारी, तुम्ही केली गद्दारी, असा स्पष्ट उल्लेख करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात बाळासाहेबांनी कशी रोखठोक भूमिका मांडली होती, याचे दाखलेही या गाण्यातून मांडण्यात आले आहे.

First Published on: October 5, 2022 6:50 PM
Exit mobile version