राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विशेष लसीकरण मोहिम

राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विशेष लसीकरण मोहिम

(फोटो प्रातिनिधिक आहे)

नियमीत लसीकरण मोहिमे व्यतिरीक्त ‘मिशन इंद्रधनुष्य’ अभियानांतर्गत २०१८ अखेर ९० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ही लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये महिन्यातील प्रत्येक २२ तारखेला दोन वर्षांच्या आतील बालके आणि गरोदर मातांना विशेष लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी संवाद साधला.

विशेष लसीकरण मोहिम

महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यातील प्रत्येक २२ तारखेला दोन वर्षांच्या आतील बालके आणि गरोदर मातांना विशेष लसीकरण करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. या विशेष लसीकरण मोहिमेच्या तयारीबाबत मंगळवारी आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाच्यावतीने ‘मिशन इंद्रधनुष्य’ अभियान राबवण्यात येते. राज्यातील जळगाव, धुळे, सांगली, कोल्हापूर, पालघर, रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये नियमित लसीकरणाव्यतिरीक्त हे अभियान राबवण्यात येते. दोन वर्षाच्या आतील बालके, गरोदर मातांना सर्व प्रकारच्या लसी या अंतर्गत देण्यात येतात. २०१८ अखेर संपूर्ण देशात मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून ९० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्याने संपूर्ण देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. त्यानुसार, महाराष्ट्राने लसीकरणाचे नियोजन केले असून तीनही महिन्यातील प्रत्येक २२ तारखेला राबवण्यात आले आहे.

या गावात दिले गेले प्रशिक्षण शिबीर

या विशेष मोहिमेकरीता आरोग्य विभागामार्फत राज्यातील जळगाव, धुळे, सांगली, कोल्हापूर, पालघर, रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण शिबीर, कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत सर्वेक्षण देखील करण्यात येत आहे. राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती नेमण्यात आली असून या समितीमार्फत विशेष लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्य कृती दल आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. या सहाही जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या लसींचा साठा पुरेसा असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

First Published on: October 9, 2018 9:58 PM
Exit mobile version