धक्कादायक! पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला

धक्कादायक! पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला

नववी, अकरावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम

आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी जवळगावमध्ये पेपर फुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला आहे. कॉपीबहाद्दरांकडून मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली आहे. परीक्षेवेळी होणार्‍या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून प्रयत्न करण्यात येत असतात. त्यानुसार यंदा परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडू नयेत यासाठी राज्य शिक्षण मंडळाने संपूर्ण राज्यामध्ये तब्बल २७३ भरारी पथके तैनात केली आहेत. तरीदेखील दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर फुटला आहे. यासर्व प्रकारामुळे नेमका हा पेपर कोणी फोटला असा सवाल उपस्थित होत आहे.

याप्रकारामुळे केंद्रप्रमुख हेतूपुरस्पर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. तसंच कॉपीबहाद्दरांचा तालुक्यातील एका केंद्रावर मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. तसंच शाळेचा निकाल जास्त लागण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचा आरोप आहे.

राज्यामध्ये यावर्षी तब्बल १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी तर ७ लाख ८९ हजार ८९४ विद्यार्थिनी आहेत. यामध्ये ९०५४ विद्यार्थी दिव्यांग आहेत. मुंबई विभागातून तब्बल ३ लाख ९१ हजार ९९१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यामध्ये २ लाख १२ हजार ५२४ विद्यार्थी आणि १ लाख ७९ हजार ४४७ विद्यार्थिंनी आहेत. राज्यामध्ये २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, परीक्षेसाठी राज्यामध्ये ४९७६ केंद्र असून, मुंबई मंडळामध्ये १०२४ इतकी केंद्र आहेत. दरवर्षी परीक्षेच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असतात. परीक्षा काळातील संभाव्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून संपूर्ण राज्यात २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहे.


हेही वाचा – मराठा समाजासाठी महत्त्वाची बातमी, सारथी संस्था बंद करणार नाही!


 

First Published on: March 3, 2020 12:53 PM
Exit mobile version