आता टाटा करणार एसटी महामंडळाला टेकओव्हर ?

आता टाटा करणार एसटी महामंडळाला टेकओव्हर ?

लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यापासून एसटी बसेसचे चाक राज्यभरात बंद आहेत. त्यामुळे आधीच तोटयात असलेल्या एसटी महामंडळाचे आणखी नुकसान झाले आहे. एसटी महामंडळाची तिजोरी पुर्णतः रिकामी झाली आहे. परिणामी कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाहीत. एसटी कामगारांना वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर गवंडी काम आणि भाजी विक्री करण्याची वेळ आली आहे. असे असतानाही राज्य सरकारने एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांना वार्‍यावर सोडण्याचे चित्र आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आता सोशल मीडियावरुन एसटी महामंडळ टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना सांभाळण्यासाठी दयावे अशी मागणी करताना दिसत आहेत.

एसटीची आर्थिक परिस्थिती खालावली 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने देशभरात सतत लॉकडाऊन वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असून फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील एसटीच्या बसेस धावत आहेत. ही सेवा देत असताना 300 हून अधिक एसटी कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. असे असतानाही एसटी महामंडळाकडून त्यांना वेतन देण्यात येत नाही. लॉकडाऊन कालावधीत सर्वच क्षेत्रातल्या कर्मचार्‍यांना पूर्ण वेतन देण्याचे शासनाचे निर्देश असतानासुद्धा एसटीमध्ये मात्र कर्मचार्‍यांना अपूर्ण वेतन मिळत आहे. एसटी कर्मचार्‍यांना मुळातच वेतन कमी; एवढ्या तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होऊन बसले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर त्यांची उपासमारची वेळ येईल. सध्याच्या काळात उत्पन्न नसल्याने एसटीची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. एसटीला राज्य सरकारने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत राज्य सरकारकडून मदत करण्यात आली नाही. सध्या एसटी महामंडळाचा संचित तोटा ७ हजार कोटीवर जाऊन पोहचला आहे. यापूर्वी कामगार संघटनेने एसटी महामंडळाला शासनात विलीन करण्याची मागणी केली होती. मात्र यावर सुध्दा कसालाही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी आता सोशल मीडियावरुन एसटी महामंडळ टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना सांभाळण्यासाठी दयावे अशी मागणी करताना दिसत आहेत.

यापूर्वी सुध्दा केली होती मागणी

राज्य परिवहन मंहामडळातील कर्मचारी सोशल मीडियावर सर्किय असतात. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांची बदली मेट्रो तीन प्रकल्पासाठी करण्यात आल्यानंतर काही दिवस हे पद रिक्त होते. तेव्हाही एसटी कामगारांनी सोशल मीडियावरुन एसटी महामंडळाच्या विकासासाठी कडक शिस्त आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्त करण्याची मागणी केली होती.

First Published on: July 24, 2020 9:00 PM
Exit mobile version