‘जनतेला वेठीस न धरता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कोर्टाच्या आदेशानंतर पुढचा निर्णय घेऊ’

‘जनतेला वेठीस न धरता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कोर्टाच्या आदेशानंतर पुढचा निर्णय घेऊ’

गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पेटलेली ठिणगी अजूनही शांत झालेली नाही आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. आज सकाळी उच्च न्यायालयाने आज ३ वाजेपर्यंत एसटीच्या संपाबाबत शासन आदेश जारी करण्याचे आणि समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सरकारने उच्च न्यायालयचाय्या आदेशांचे पालन केले असून न्यायालयच्या अंतिम आदेशाची प्रत मिळाली नाही आहे. न्यायालयाची प्रत मिळाल्यानंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले की, आज सकाळी उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते की, राज्य सरकारने समिती गठीत करावी. दुपारी ३ वाजता याचा जीआर काढावा. ४ वाजता या समितीची पहिली बैठक घ्यावी. या बैठकीत विलनीकरणाच्या बाबतीत पुढील १० दिवसांत बैठका घेऊन कारवाईचा प्रारंभ करावा आणि १२ आठवड्यात आत सर्व युनियनशी बोलून समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करावा आणि तो न्यायालयात द्यावा. त्याप्रमाणे ताबडतोब प्रशासनाची सर्व यंत्रणा कामाला लावून दुपारी ३ वाजता जीआर काढला. जीआरमध्ये न्यायालयाने जे आम्हाला निर्देश दिले होते. त्याचा उल्लेख त्यात केला. त्याचबरोबर दुपारी ४ वाजता त्रिसदस्यी समितीची बैठक झाली. त्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचे मिनिट्स बनवून आम्ही संध्याकाळी ५ वाजता उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन आम्ही सरकारच्या आणि एसटीच्या वतीने पूर्ण केले आहेत. यावर अजूनही उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाची प्रत मिळालेली नाही. आम्ही आदेशाची वाट बघतोय. आदेशाची प्रत प्राप्त मिळाली की, पुढे काय करायचे याच्या बाबतीला निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल.’

पुढे परब म्हणाले की, ‘आता उच्च न्यायालय आपल्या आदेशात काय म्हणतंय तो बघून निर्णय घेतला जाईल. राज्य सरकारने आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न केले आहेत. शेवटी प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने जे निर्देश दिले ते एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने सहानभूती पूर्वक निर्णय दिले होते. त्याचे पालन केले आहे. पण याचं राजकारण करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत संप चिघळवणार असेल तर याबाबतीत आम्हाला विचार करावा लागले. फक्त कोर्टाच्या आदेशाची वाट पाहतोय.’

‘कदाचित आज रात्री, उद्या सकाळपर्यंत उच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येतील. विलनीकरणाच्या मागणीच्या व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. राज्य सरकारमध्ये विलनीकरण करणे हे एक दोन दिवासांचे काम नाही. त्याला काही दिवस लागतील. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, जनतेला वेठीस धरू नये,’ असे आवाहन अनिल परब यांनी केले.

First Published on: November 8, 2021 7:43 PM
Exit mobile version