उत्कृष्ट कामगिरीमध्ये एसटी नापास; ३१ विभागांपैकी एकही धड नाही!

उत्कृष्ट कामगिरीमध्ये एसटी नापास; ३१ विभागांपैकी एकही धड नाही!

प्रातिनिधिक फोटो

एसटी महामंडळाच्या एकूण ३१ विभागांपैकी एकही विभागाला उत्कृष्ट कामगिरी करता आली नाही. तर २५० आगारापैकी फक्त १४ आगारांना उत्कृष्ट कामगिरी करता आली आहे. उर्वरित २३६ आगार उत्कृष्ट कामगिरी करू शकली नाही, अशी कबुली खुद्द एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनीच पत्रातून दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कारभावर प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहे.

एसटी महामंडळाच्या सांख्यिकी विभागाने राज्यातील सर्व आगार आणि विभागातील कामकाजाचा आढावा घेतला. आढावा प्रक्रियेत प्रवासी भारमान, प्रति किमी उत्पन्न, दहा लिटर मागे कितीचे प्रमाण, बस ताफयाचा वापर, उत्पन्न, नवीन टायरचा वापर या मुद्द्यांचा समावेश होता. सांख्यिकी विभागाच्या सप्टेंबर २०१९ महिन्यातील अहवालाच्या आधारे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी राज्यातील ३१ विभाग नियंत्रकांना ९ नोव्हेंबर रोजी पत्र धाडले आहे. राज्यातील ३१ विभागांपैकी एकही विभागांला उत्कृष्ट कामगिरी करता आली नाही आहे. तसेच राज्यातील २५० आगारांपैकी केवळ १४ आगारांचा उत्कृष्ट कामगिरीचा दर्जा दिला आहे.

दरम्यान, ९७ आगारांचा दर्जा चांगली कामगिरी, १०७ आगारांना समाधारक आणि ३२ आगारांचा दर्जा निकृष्ट आहे. एसटीच्या सांख्यिकी विभागाने राज्यभरातील एसटीचे आगार आणि विभागाचा भारमान, प्रति किमी उत्पन्न, विना वातानुकूलित फेऱ्यांचे दहा लीटर मागे किमी, ताफ्याचा वापर यानुसार वर्गीकरण करून गुण दिले. अहवालाच्या आधारे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक देओल यांनी संबंधित विभाग नियंत्रकांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. संबंधित आगार आणि विभाग दर्जा सुधारण्यासाठी काय करणार आहे, याचा अहवाल मुख्यालयात पाठवण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना देण्यात आल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली.

सप्टेंबर २०१९ महिन्यातील अहवाल

वर्गीकरण                   विभाग                   आगार

उत्कृष्ट कामगिरी            ००                       १४
चांगली कामगिरी           १५                       ९७
समाधान कारक            १४                      १०७
सुधारणा आवश्यक        ०२                        ३२


एकूण                      ३१                        २५०

हेही वाचा –

‘इनसाइड एज २’ चा दमदार ट्रेलर लाँच!

First Published on: November 18, 2019 10:35 PM
Exit mobile version