उद्यापासून एसटीची तिकिटे १० टक्क्यांनी महागणाार!

उद्यापासून एसटीची तिकिटे १० टक्क्यांनी महागणाार!

एकिकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दिवाळीनिमित्त जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. तर दुसऱ्या बाजुला उद्यापासून १० टक्के भाडेवाढदेखील लागू केली आहे. त्यामुळे एसटीने राज्यातल्या नागरिकांना दिवाळीनिमित्त जादा गाड्यांचे गिफ्ट दिले आणि स्वतःच रिटर्न गिफ्ट परत घेतले आहे. महामंडळाने वाढवलेल्या प्रवासी भाड्याची अंमलबजावणी उद्या, १ नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. वाढविण्यात आलेल्या दहा टक्के प्रवासी भाड्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार आहे. एसटीच्या पुणे विभागाने प्रवासी भाडे निश्चित केले आहे.

भाडेवाढ दरवर्षी ठरलेली

गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर भाडेवाड लागू करत आहे. गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त २० टक्के, १५ टक्के आणि १० टक्के अशी भाडेवाढ केली होती. या वर्षी केलेली भाडेवाढ आज रात्री मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. उद्यापासून पुण्याच्या शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकातून पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, विदर्भ आणि मराठवाड्यात जादा बस सोडल्या जाणार आहेत.

वाचा –  ईव्हीएम मशिन्सवर माझा विश्वास आहे – अजित पवार

यासाठी करण्यात आली भाडेवाढ

एस.टी.महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने भाडेवाढ करण्यात येते. ३० टक्क्यांपर्यंत ही भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरुपाची एसटी भाडेवाढ करण्यात येते. यानुसारच यंदा दरवर्षीप्रमाणे सेवाप्रकार निहाय १० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली आहे.

First Published on: October 31, 2018 10:22 AM
Exit mobile version