एसटी कामगाराच्या चिमुकलीचं बाबांच्या पगारासाठी मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र!

एसटी कामगाराच्या चिमुकलीचं बाबांच्या पगारासाठी मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र!

काही दिवसांपूर्वीच सातारा जिल्हातील एसटी महामंडळाच्या एका चालकाने वेतन कमी आणि कामाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याची घडना ताजी असतानाच जालन्यातील एका एसटीच्या वाहकाच्या चिमुकल्या मुलीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून आपलं गाऱ्हाणं मांडलं आहे. कमी पगार असल्यामुळे जास्त पैसे मिळवण्यासाठी बाबांना करावा लागणारा ओव्हर टाईम आणि त्यामुळे आपल्याला वेळ देता येत नसल्याची तक्रार या चिमुरडीनं आपल्या पत्रामध्ये केली आहे. बाबांचा पगार वाढवला, तर त्यांना ओव्हर टाईम करावा लागणार नाही आणि मला वेळ देता येईल, अशी विनंती देखील या पत्रात केली आहे.

पप्पांसाठी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र!

‘सरकार भिकार आहे. नोकरदाराला मरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पगार वाढत नाही. अधिकारी अधिकार बजावत असतात. पगार तोकडा, महागाई मोठी. या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून सातारा जिल्यातील दहिवडी आगारात काशिनाथ अनंतराव वसव या एसटी चालकाने चारच दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर या चिमुकलीचं हे पत्र पुरेसं बोलकं आहे. पहिल्या वर्गात शिकणार्‍या या मुलीने आपल्या वडिलांची समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कळवली आहे. हे पत्र लिहिणाऱ्या या चिमुकलीचं नाव श्रेया हराळे असून ती जालना जिल्यातल्या अंबडच्या मासोदरी इंग्लिश स्कूलमध्ये शिकते. श्रेयाचे वडील श्रेयाला शाळेत सोडायला येत नाहीत. पगार कमी असल्यामुळे आपल्याला ओव्हर टाईम करावा लागतो आणि त्यामुळेच मी तुला वेळ देऊ शकत नाही, असं श्रेयाच्या वडिलांनी तिला सांगितलं आहे. त्यावरच नाराज होऊन चिमुकल्या श्रेयाने थेट मुख्यंमत्र्यांनाच पत्र लिहिलं आहे.

काय लिहिलंय पत्रात?

या पत्रात श्रेया म्हणते, ‘आदरणीय मुख्यमंत्रीजी, माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे. मी मासोदरीह इंग्लिश स्कूल अंबडच्या पहिल्या वर्गात शिकतो. पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसांपासून अंबडच्या बसमध्ये कंडक्टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात. मी त्यांना विचारले तर मला म्हणतात सोनू बेटा मला ओव्हर टाईम करावा लागतो. माझा पगार कमी आहे म्हणून. आदरणीय मुख्यमंत्रीजी, माझी विनंती आहे तुम्हाला. माझ्या पप्पांचा पगार वाढवा ना. मग माझे पप्पा मला शाळेत सोडायला येतील आणि ओव्हर टाइम सुद्धा करणार नाही. माझे पप्पा खूप चांगले आहेत.

First Published on: December 12, 2019 10:47 PM
Exit mobile version