ST Workers Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एसटी महामंडळाने सांगितले व्हायरल पत्रामागील सत्य

ST Workers Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एसटी महामंडळाने सांगितले व्हायरल पत्रामागील सत्य

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा आता कोर्टात जाऊन पोहचला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हजारो एसटी कर्मचारी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. मात्र पगार वाढ आणि इतर काही मागण्या मान्य होताच बहुतांश एसटी कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे. तसेच कामावर रूजू देखील झाले आहेत. मात्र एसटीचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी आजही अनेक एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. अशात एसटी महामंडळाच्या नावे एसटी संपातून माघार घेत पुन्हा कामावर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या पत्राबाबत आता एसटी महामंडळाने स्पष्टीकरण देत बोगस असल्याचे जाहीर केले आहे. तसेच या प्रकरणी एसटी महामंडळाकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वेतनवाढ, एसटी महामंडळाचे विलिनीकरण आणि इतर विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यातील वेतन वाढीची आणि इतर मागण्या सरकारने मान्य केले. यानंतर एसटी महामंडळाने आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले. यावेळी कामावर रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे सरकारने आश्वासन दिले. मात्र या व्हायरल पत्रातील कारवाईच्या उल्लेखामुळे आता हजारो एसटी कर्मचाऱ्यांची झोप उडाली होती.

एसटी महामंडळाच्या नावे व्हायरल होणाऱ्या पत्रात नेमक काय म्हटलयं?

एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या सहीचे एक परिपत्रक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या परिपत्रात असे नमूद केले आहे की, सर्वाधिक एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर आणि एसटी वाहतूक सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर 29 ऑक्टोबर 2021 ते 10 मार्च 2022 पर्यंत संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर पुढील कार्यवाही करण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या विभागांना देण्यात आले होते.

व्हायरल पत्रावर एसटी महामंडळाने स्पष्टीकरण

एसटी महामंडळाने व्हायरल पत्र बनावट असल्याचे जाहीर करत त्यावर खुलासा दिला आहे. एसटी महामंडळाने म्हटले की, हे पच्र पूर्णपणे बनावट असून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कामावर रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करण्यासाठी हे बनावट पच्र व्हायरल होतेय असं एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले आहे. एसटी महामंडळाने याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच येत्या 10 मार्च 2022 पर्यंत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केलेय.


महिलांच्या पुरुषांकडून असतात ‘या’ 8 अपेक्षा

First Published on: March 8, 2022 2:49 PM
Exit mobile version