शिंदे सरकारची महाराष्ट्र विकासाची योजना, राज्य सल्लागार समिती होणार गठीत

शिंदे सरकारची महाराष्ट्र विकासाची योजना, राज्य सल्लागार समिती होणार गठीत

मुंबई – राज्यातील शिक्षण, कृषी, आरोग्य आणि रोजगार या महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी केंद्राच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात राज्य सल्लागार समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीत संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल. धोरण ठरविण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी ही समिती सरकारला मदत करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर १५ दिवसांनी या समितीची बैठक घेतील, अशी माहिती राज्य सरकारच्या सूत्रांनी बुधवारी दिली.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने राज्यातील कळीच्या आणि वर्षानुवर्षे भेडसावत असलेल्या मुद्द्यांना हात घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण, कृषी, आरोग्य आणि रोजगार क्षेत्राशी संबंधित अडचणी दूर करून त्यांना उभारी देण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. या समितीत संबंधित तज्ज्ञ अभ्यासकांसह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याकडे सरकारचे लक्ष आहे. खासगी संस्थांच्या सहभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राला अधिकाधिक सुविधा देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यावर ही समिती काम करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्याच्या विकासाच्या द़ष्टीने जी क्षेत्र महत्वाची आहेत त्यांच्यावर या समितीच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

राज्यातील रोजगार वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील जनतेचे उत्पन्न वाढावे यासाठी खास लक्ष देण्यात येईल. पायाभूत सुविधांचा विकास जास्तीत जास्त करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असेही सूत्रांनी सांगितले.

अपूर्ण प्रकल्प मार्गी लावणार –

राज्यात पायाभूत सुविधांचे किती प्रकल्प अपूर्ण आहेत याची माहिती घेण्यात येत आहे. राज्याच्या विकासाच्या द़ष्टीने महत्वाचे असणारे हे अपूर्ण प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

First Published on: September 7, 2022 8:41 PM
Exit mobile version